दौंडमध्ये अवघे चारच जलतरण तलाव

दौंडमध्ये अवघे चारच जलतरण तलाव

प्रकाश शेलार : सकाळ वृत्तसेवा

खुटबाव, ता. २५ : संपूर्ण दौंड तालुक्यात खासगी व शासकीय मिळून केवळ ४ जलतरण तलाव आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या उकाड्यामध्ये तरुणाई, चिमुकले आपला जीव धोक्यात घालून विहीर, कालवा, नदी व‌ तलावामध्ये पोहताना दिसत आहेत.


दौंड तालुक्याची लोकसंख्या साडेचार लाखांच्या आसपास आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला पोहण्यासाठी पुरेशा जलतरण तलावाची सुविधा नाही. त्यामुळे येथील चिमुकले पर्यायी मार्गाचा वापर करताना दिसत आहेत. या पोहण्यावर नियंत्रण नसल्याने अनेकदा चिमुकल्यांनी जीव गमावण्याच्या घटना घडलेल्या आहेत. विहिरीत पोहताना अनेक जण १५ ते २० फूट उंचीच्या कठड्यावरून पाण्यामध्ये उडी मारतात. त्यातून अनेक जीवघेण्या घटना घडलेल्या आहेत. खासगी जलतरण तलावातील पोहणे हे सर्वसामान्यांसाठी परवडणारे नसून, एका तासाला किमान ५० रुपये ते ७० रुपयांपर्यंत दर आहेत. त्यामुळे गरीब कुटुंबातील अनेक चिमुकले पोहण्यासाठी विहीर तलाव व कालव्याचा वापर करतात. तसेच, यवत परिसरामध्ये काही ॲग्रो टुरिझम पर्यटन केंद्रे आहेत. या प्रत्येक पर्यटन केंद्रामध्ये जलतरण तलाव आहे. त्याचा लाभ पर्यटन केंद्रास भेट देण्यात देण्यास आलेले प्रवासी घेताना दिसतात.


मोठ्या गावांमध्ये सुविधा करावी
तालुक्यामध्ये राहू, खामगाव, पारगाव, वरवंड, पाटस, खडकी, गोपाळवाडी, बोरीपार्धी, कानगाव ही मोठ्या लोकसंख्येची गावे आहेत. या गावांमध्ये किमान १ जलतरण तलाव असल्यास आसपासच्या गावातील मुले पोहण्यासाठी येथे येऊ शकतात. त्यातून सध्या असलेल्या ४ जलतरण तलावांवरील अतिरिक्त ताण कमी होण्यास मदत होईल.

सोसायट्यांमध्येही वाणवा
जलतरण तलाव असणारी सोसायटी अद्याप तालुक्यात नाही. पुणे, बारामतीसारख्या शहरामध्ये उच्चभ्रू सोसायटीमध्ये अनेक जलतरण तलाव आहेत. दौंड शहर, केडगाव व यवत परिसरामध्ये अनेक सोसायट्यांचे बांधकाम झाले असले, तरी या सोसायट्यांमध्ये अद्याप एकही जलतरण तलाव बांधलेला नाही.

यवत हे तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्येचे मोठे गाव आहे. चिमुकल्यांची गरज ओळखून ४ वर्षांपूर्वी येथे जलतरण तलाव बांधला. येथे नियमितपणे पोहणारे ५० पासधारक आहेत. याशिवाय उन्हाळा असल्याने तासवारी पद्धतीने पोहणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे.
- चिंतन यादव, कोहिनूर जलतरण तलाव, यवत

पूर्वी मुळा मोठा नदी व भीमा नदीचे उथळ पात्र असल्याने संपूर्ण नदीकाठची गावे नदीमध्ये पोहायला जायची. जलपर्णीची समस्या निर्माण झाली व नदीतील पोहणे बंद झाले. त्यामुळे आपल्या पाल्यांना पोहायला शिकवायचे कुठे हा मोठा प्रश्न आहे. अनेकदा वेळ व पैसा खर्च करून पारगावपासून १० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या केडगाव येथील जलतरण तलावावर पाल्यांना पोहण्यासाठी न्यावे लागते. स्थानिक प्रशासनाने पुढाकार घेऊन पारगाव येथे मुलांना पोहण्यासाठी जलतरण बांधावा.
- राजेंद्र ताकवणे, ग्रामस्थ, पारगाव (ता. दौंड)

येथे आहेत तलाव
दौंड नगरपालिकेचा, राज्य राखीव पोलिस बल १ येथील, केडगाव व यवत येथे खासगी मालकीचे प्रत्येकी १

जलतरण तलावांतील पोहण्याचे दर
खासगी
प्रति तास पोहणे- ५० रुपये
नियमित मासिक पास-१३००
२१ दिवसांचे कोचिंग क्लास- २५०० रुपये
शासकीय
प्रति तास पोहणे -४० रुपये
मासिक पास- ६०० रुपये
१ महिन्याचे कोचिंग क्लास- १६०० रुपये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com