दौंडच्या अभिलेखागारात ब्रिटिशकालीन ठेवा

दौंडच्या अभिलेखागारात ब्रिटिशकालीन ठेवा

खुटबाव, ता. ६ ः दौंड येथील अभिलेखागारात शासन नियुक्त वाचक कुणबीच्या नोंदी शोधण्याचे काम करत आहेत. त्याच वेळी मोडी लिपीतला ब्रिटिश कालीन ठेवा असणारी दुर्मिळ मुखपृष्ठे सापडले आहेत.

दौंड तालुक्यातील अभिलेख विभागात कुणबीच्या नोंदी शोधण्याचे काम सुरू आहे. त्यावेळी मोडी लिपीतील वेगवेगळ्या गावांचे दप्तर वाचन करताना मोडी लिपी वाचक कांचन अभय कोठावळे, संदीप शिवले, मधुकर बाराते, वैभव शितोळे यांना हा दुर्मिळ ठेवा सापडला आहे. महसूलमध्ये असलेल्या अस्सल रेकॉर्डसाठी बाहेर देशातून कागद आयात केल्याचे लक्षात येते. या दप्तरांना मुखपृष्ठे लावून त्यावर कंपनी सरकारचा लोगो‌ लावला आहे. त्यापैकी एका मुखपृष्ठावर प्राण्यांच्या कातडीपासून बनवलेले चित्र देखील आढळून आले आहे. तसेच ब्रिटिश कालीन वेगवेगळे गव्हर्नर व राणी यांचे फोटो रेखाटले आहेत. त्याचप्रमाणे राणी विक्टोरिया हिचे रंगीत चित्रं, मेड इन ऑस्ट्रेया हे मुखपृष्ठ असलेली फाईल सापडली आहे. यामध्ये ब्रिटिश सरकारने अनेक परदेशातून आयात केलेली मुखपृष्ठे पाने सापडली‌ आहेत. यामध्ये बेल्जियम, ऑस्ट्रिया, फ्रान्स या देशांचा समावेश आहे. मुखपृष्ठावर ब्रिटिश अणि कंपनी सरकारचे चित्र यांचे लोगो‌ वापरले आहेत. यावरून ब्रिटिश कालामध्ये दौंडचे स्थान खुप महत्वाचे होते, हे लक्षात येते. दप्तर जुने झाल्याने सावकाश हाताळावे लागत आहे. इस १८४५ पासूनचे कागदपत्रे दौंड दप्तरात आढळत आहेत. त्यामुळे जुने दप्तर खूप आल्हाददायक हाताळले असल्याचे लक्षात येते. या कामी तहसिलदार अरुण शेलार, नायब तहसिलदार‌ शितल देशमुख, शरद भोंग, रवी जराड यांनी मदत झाली आहे.

ब्रिटिश काळात दौंड रेल्वे महत्वाचे केंद्र
ब्रिटिश कालखंडात दौंड हे रेल्वे प्रशासनाचे महत्वाचे केंद्र होते. दौंड येथे पहिले वायरलेस केंद्र होते. रेल्वेचे जंक्शन झाल्यानंतर ख्रिश्चन मिशनरीमध्ये २ चर्च ब्रिटिशांनी बांधले. १८७८ मध्ये भीमा नदीवरील रेल्वेच्या पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर रेल्वेची वाहतूक मनमाडपर्यंत केली. हा रेल्वेपुल आजही वापरात आहे. रेल्वे सुविधामुळे परदेशात निर्माण होणाऱ्या वस्तू दौंडपर्यंत येत होत्या, असे आढळले आहे. त्याच प्रमाणे दौंड येथे पहिली खानेसुमारी इस १८७१ मध्ये झाल्याचे जाणकार सांगतात.

जुने दप्तर हाताळताना ब्रिटिशकालीन दुर्मिळ वस्तूचा ठेवा आम्हाला सापडला. हे दप्तर अतिशय अद्यापही सुस्थितीत असून मुखपृष्ठ आकर्षक बनवले आहे. जवळपास २५ पेक्षा अधिक दप्तराच्या मुखपृष्ठावर वेगवेगळी ब्रिटिश कालीन छायाचित्र लावली आहेत.
- कांचन कोठावळे, मोडी लिपीशोधक, शिंदे समिती

मिळालेल्या महसुली पुराव्यावरून दौंड हे ब्रिटिशकालीन महत्त्वाचे रेल्वेचे सत्ता केंद्र होते, असे लक्षात येते. मिळालेली दुर्मिळ मुखपृष्ठे जतन करण्याचे काम दौंड महसूल विभागामार्फत केले जाईल.
- अरुण शेलार, तहसीलदार (ता.दौंड)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com