

खुटबाव, ता. १८ : सध्या दौंड तालुक्यामध्ये नवीन मुळा-मुठा कालव्यामध्ये खडकवासला प्रकल्पाचे उन्हाळी आवर्तन चालू आहे. कालव्यातील पाणी हेड टु टेल जाण्यासाठी पाटबंधारे कर्मचाऱ्यांना रात्री अपरात्री जागे राहण्याची वेळ आली आहे. विद्युतपंप किंवा सायफन पद्धतीने कालव्यातून पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांची पाइपलाइन फोडण्याची धडक कारवाई पाटबंधारे पथक करत आहे. या कारवाईमुळे शेतकरी वर्गामध्ये अस्वस्थता आहे.
उन्हाळी आवर्तन चालु आहे. साधारण ४५ दिवसांच्या अवधीमध्ये दुसरे आवर्तन येते. उन्हाळा चालू असल्याने खडकवासला कालव्यावर अवलंबून असणारी पिके पाण्याविना इतका वेळ जगू शकत नाही. यावर पर्याय म्हणून दौंड तालुक्यातील लाभक्षेत्र धारक अनेक शेतकऱ्यांनी अधिकृत परवाना घेत कालव्यामधून सायफन पद्धतीने किंवा विद्युत पंप पाईपलाईनच्या साह्याने कालव्यातील पाणी शेतीमध्ये उचलत आहेत. यामध्ये भरीस भर म्हणून गेली काही वर्षापासून पाणीपट्टी न भरणारी अथवा परवाना नसलेले शेतकरी कालव्यातून अनधिकृत उपसा सिंचन करत आहेत. संबंधित पाणी पाइपलाइनमधून शेतकऱ्यांच्या विहिरीत सोडले जाते. त्यानंतर विहिरीतून शेतीसाठी सिंचन केले जाते.
या पाणी चोरीमुळे पाटबंधारे खाते अस्वस्थ झाले असून गेल्या पंधरवड्यापासून कर्मचाऱ्यांनी पाणी उपशावर धडक कारवाई सुरू केली आहे. पाटबंधारे खात्याच्या या कारवाईचा फटका नियमित पाणीपट्टी भरणाऱ्या शेतकऱ्यांना बसत आहे. सध्या आठ तास शेतीसाठी वीज मिळते. त्यामुळे दिवसभरातून १६ तास विजेअभावी सिंचन बंद असते. उपसा सिंचनास येणाऱ्या अडचणीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके जळू लागली आहेत.
पाटबंधारे विभागामध्ये अनेक सेवानिवृत्त कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्याकडून अर्थपूर्ण चर्चा केल्यानंतर ठराविक शेतकऱ्यांना रात्री अपरात्री पाणी दिले जाते. त्यामुळे नियमित पाणीपट्टी भरणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे.
- अक्षय भोंडवे, शेतकरी
१९९८ सालापासून आमचा पाणी परवाना आहे. अलीकडील काळामध्ये अनेक शेतकरी पाणीपट्टी न भरता कालव्यातून पाणी शेतीसाठी नेत आहेत. प्रशासन परवानाधारक शेतकरी व विना परवानाधारक शेतकरी यांना एकाच अटीमध्ये गृहीत धरत आमचा पाणी उपसा बंद करत आहेत. त्यामुळे आमच्यावर अन्याय होत आहे.
- तुषार दोरगे, शेतकरी
सध्या प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही. पाणी हेड टू टेल जाण्यासाठी शेतकऱ्याकडून सहकार्य मिळणे आवश्यक आहे. आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये पाणी आल्यानंतर शेतकऱ्यांनी नियमितपणे उपसा सिंचन करून प्रशासनास सहकार्य करावे.
- सुहास साळुंखे, सहाय्यक अभियंता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.