शिक्षक दांपत्याने उंचावली शाळेची ओळख

शिक्षक दांपत्याने उंचावली शाळेची ओळख

Published on

खुटबाव, ता. २४ : मिरवडी (ता. दौंड) परिसरातील शेलार-मेमाणेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा लोकसहभाग व शिक्षक दांपत्याच्या योगदानातून चेहरा मोहराच बदलला आहे. या शाळेत २०१९ मध्ये अवघे १३ विद्यार्थी अध्ययन करत होते. शाळेची भिंत पडण्याच्या अवस्थेत होती. शाळा बंद पडेल की काय, अशी परिस्थिती असताना मुख्याध्यापक अमर खेडेकर व धनश्री पासलकर-खेडेकर या शिक्षक दांपत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवीत शाळेत जिवंतपणा आणला असून एखाद्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेलाही लाजवेल‌, असे आंतरराष्ट्रीय सहशालेय उपक्रम राबवीत शाळेची नव्याने ओळख तयार केली आहे.
या उपक्रमांमुळे ९०० लोकसंख्या असणाऱ्या शेलार-मेमाणवाडी येथील शाळेची पटसंख्या आज १६० झाली आहे. शाळेच्या विकासासाठी २०१९ मध्ये उद्योजक एल.बी. कुंजीर यांनी २५ लाख रुपये खर्चून दोन वर्गखोल्या व स्वच्छतागृह बांधून दिले होते. शंकर कुंजीर व ग्रामस्थांनी शाळेसाठी १६ गुंठे जागा देणगी म्हणून दिली. शिवनेरी उद्योग समूहाच्या वतीने शाळेसाठी संगणक प्रयोगशाळा, फर्निचर, वायफाय, पीओपी करून देण्यात आले. मिरवडी ग्रामपंचायतीने शाळेसाठी भव्य व्यासपीठ, प्रत्येक वर्गात टीव्ही व प्रोजेक्टर दिले. तर अमेझॉनने शाळेला बक्षीस म्हणून लॅपटॉप, पाच टॅब व दोन अलेक्सा दिले आहेत.

खेडेकर दांपत्याच्या या प्रयत्नांमुळे आज आज येथील विद्यार्थी मनोरंजनातून शिक्षण घेत इंग्रजी व जर्मन भाषाही शिकले आहेत. तसेच अनेक राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होऊन चांगली कामगिरी करत आहेत. आज शाळेने सीएस हेकॅथॉन (कोडिंग) स्पर्धेत राज्यात तिसरा तर पुणे जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. यशवंतराव चव्हाण कला क्रीडा स्पर्धा २०२४ मधील प्रश्नमंजूषा या प्रकारात विद्यार्थ्यांनी तालुक्यात प्रथम, तर जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकाविला आहे. तसेच ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानात तालुक्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे. आज राज्यभरातून अनेक शिक्षक, विद्यार्थी व पालक या शाळेतील उपक्रम पाहण्यासाठी शेलार-मेमाणेवाडी जिल्हा परिषद शाळेला भेटी देत आहेत.

खेडेकर दांपत्याने राबविलेले उपक्रम
कोडिंग, रोबोटिक्स, वेबसाइट डेव्हलपमेंट, जर्मन भाषा अध्ययन, ऑलिंपिक गेम- धनुर्विद्या (आर्चरी), टेलिस्कोपद्वारे आकाश निरीक्षण, अबॅकस, पिअर लर्निंग, वाढदिवसानिमित्त पुस्तक भेट, स्टुडन्ट ऑफ द मंथ व स्टुडन्ट ऑफ द इयरचा पुरस्कार.


शाळेच्या पटसंख्येतील प्रगती
- २०१९ : पहिली ते चौथी - १३ विद्यार्थी
- २०२१ : पहिली ते सहावी - १२४ विद्यार्थी
- २०२३ : पहिली ते सातवी - १५५ विद्यार्थी
- २०२३ : पहिली ते सातवी - १६० विद्यार्थी


आमच्या शेतकरी कुटुंबातील चिमुकल्यांना शिक्षणासाठी पायपीट करावी लागेल अशी परिस्थिती २०१९ मध्ये होती. कारण शाळा बंद पडण्याच्या मार्गावर होती. ग्रामस्थांनी योगदान दिले, दुग्ध शर्करा योग म्हणजे खेडेकर दांपत्य शाळेमध्ये शिक्षक म्हणून आले. आज परिसरातील अनेक विद्यार्थी गुणवत्ता पाहून शाळेमध्ये प्रवेश घेत आहेत. चालू वर्षी शासनाच्या निर्णयानुसार खेडेकर दांपत्य बदलीस पात्र आहेत, मात्र हा आमच्यासाठी मोठा धक्का असून, दांपत्याची बदली रद्द करण्यासाठी ग्रामस्थ वज्रमुठीने प्रयत्न करणार आहेत.
- सागर शेलार, ग्रामस्थ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com