नानगाव येथील फ्लॉवरची दिल्लीकरांना गोडी

नानगाव येथील फ्लॉवरची दिल्लीकरांना गोडी

Published on

खुटबाव, ता.२१ : नानगाव (ता. दौंड) येथील ५०० एकर उसाच्या क्षेत्रात आंतरपीक म्हणून घेतलेल्या फ्लॉवर पिकाची गोडी दिल्लीकरांना पडली आहे. नानगाव का फ्लॉवर बहुत बढिया! असे म्हणत दररोज नानगावमधून ३० टन फ्लॉवर १२ चाकी ट्रकमधून दिल्लीकडे रवाना केला जातो. विशेष म्हणजे फ्लॉवरचा बाजारभाव स्थानिक शेतकरी ठरवत आहेत. फ्लॉवरमुळे येथील शेतकऱ्यांच्या घरी आर्थिक सुबत्ता आली आहे.

गेली पाच वर्षांपासून दिल्ली येथील जुनेद व हसमुख हे व्यापारी फ्लॉवरच्या हंगामामध्ये नानगाव परिसरात राहतात. दररोज सकाळी उत्पादित झालेला माल ट्रॅक्टरमध्ये भरून शेतकरी गणेश रस्ता येथील दत्तात्रेय खळदकर यांच्या घरासमोर आणतात. त्यानंतर मुंबई व पुणे येथील विकलेल्या फ्लॉवर मालाच्या दराची चौकशी केली जाते. त्यानंतर सर्वानुमते बाजारभाव ठरवला जातो. तो ठरवताना फ्लॉवर उत्पादक १०० ते १५० शेतकरी उपस्थित असतात. त्यानंतर वेगवेगळ्या तीन ट्रकमध्ये माल वजन काट्यावर वजन करून भरला जातो.


तीन दिवसांनंतरही माल टवटवीत
नानगावहून पाठविलेला फ्लॉवर तीन दिवस माल खराब होऊ नये, अशी व्यवस्था ट्रकमध्ये केली जाते. हवा खेळती राहावी म्हणून मधल्या भागामध्ये लाकूड व पाइप ठेवले जातात. दोन दिवसांच्या प्रवासानंतर नानगावचा माल दिल्ली येथील बाजारपेठेत आहे तसाच टवटवीत दिसतो. एका ट्रकला वाहतुकीसाठी एक लाख १० हजार रुपये भाडे असते. चालकाने वेळेत फ्लॉवरचे पीक दिल्लीला पोहोच केल्यास व्यापाऱ्यांकडून त्यांना प्रत्येक ट्रकमागे दहा हजार रुपये बक्षीस मिळते.

दृष्टिक्षेपात फ्लॉवरची वैशिष्टे
* एक गड्डा अर्धा ते पाऊण किलो असतो.
* पांढरा शुभ रंग असतो
* फ्लॉवर पिकाला टीक अथवा बुरशी नसते
* शेतमाल टवटवीत दिसतो.

गेली १० वर्षापासून फ्लॉवरचे पीक घेत आहे. यावर्षी सहा एकर उसामध्ये आंतरपीक म्हणून फ्लॉवरचे पीक घेतले आहे. चालू वर्षी प्रतिकिलो दहा ते तीस रुपये बाजार भाव मिळाला आहे. दोन महिन्यात एकूण आठ लाख रुपये फ्लॉवर पिकाचे मिळाले आहेत.
- पांडुरंग खळदकर, शेतकरी, नानगाव (ता. दौंड)

दररोज सकाळी घरासमोरील काट्यावर ट्रॅक्टर मधून फ्लॉवर आणली जाते. दिल्लीकरांच्या विश्वासार्हतेवर आमचा व्यवहार होतो. फ्लॉवरचे पीक दिल्लीत पोहोचल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना ऑनलाइन पैसे मिळतात. गेली पाच वर्षांपासून निरंतरपणे नानगाव परिसरातील शेतकऱ्यांना या पिकाने आर्थिक बळ मिळाले आहे.
- डी.के. खळदकर ( मध्यस्थी)

02798-1

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com