खते, पाणीपुरवठा एकत्रितपणे करणारी स्वयंचलित ठिबक यंत्रणा

खते, पाणीपुरवठा एकत्रितपणे करणारी स्वयंचलित ठिबक यंत्रणा

Published on

खुटबाव, ता. २९ : पारगाव (ता. दौंड) येथील सेंद्रिय शेतीच्या पुरस्कर्त्या वसुधा सरदार यांनी १०० एकर शेतीला पाणी व खत एकत्रित पुरवठा करणारी ठिबक सिंचन स्वयंचलित यंत्रणा सुरू केली आहे. यासाठी त्यांना प्रतिएकर २५ हजार रुपये खर्च आलेला आहे. नदीच्या पाण्याला ठिबक सिंचन व स्वयंचलित खत व पाणीपुरवठा करणारी यंत्रणा असणारा हा दौंड तालुक्यातील सर्वात मोठा व पहिलाच अभिनव प्रयोग आहे. शेती क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल केल्याने वेळ, पैसा व श्रमामध्ये बचत झाली आहे. या यंत्रणेमुळे फक्त दोन मजूर १०० एकर उसाला खते व पाणी देण्याचे काम आरामशीरपणे करत आहेत.
भीमा नदीचे पाणी दोन विद्युत पंपाच्या साह्याने एका दहा लाख लिटर क्षमता असणाऱ्या सिमेंटच्या टाकीमध्ये साठवले जाते. टाकीमध्ये पाण्याचा गाळ तळाशी बसल्यानंतर पुन्हा चार विद्युत पंपांच्या साह्याने पाणी शेतीसाठी खेचले जाते. यासाठी स्टार्टर व कमांड मशिनच्या माध्यमातून स्वयंचलित यंत्र सुरू केले जाते. स्वयंचलित यंत्राच्या माध्यमातून दोन मॉनिटर प्रोग्रॅम सेट केले जातात. यामध्ये शेतीला किती लिटर पाणी आवश्यक आहे व खतांची मात्र किती पाहिजे हे समजल्यानंतर पाणी व खत दिले जाते. यामध्ये स्वयंचलित यंत्र बसवण्यासाठी सरदार यांनी पाच हजार स्क्वेअर फूट आकाराची मोठी खोली बांधली आहे. टाकीमधून आलेले पाणी सॅंड फिल्टर फिल्टर व डिक्स फिल्टरमध्ये गाळले जाऊन वॉल्वमार्फत मुख्य लाईनला जाते. यामध्ये जीवामृत व संजीव अमृत ही खते मिसळण्याची प्रक्रिया केली जाते. समजा एखाद्या शेतीपिकास दोन लाख लिटर पाणी आवश्यक शेवटच्या ५० हजार लिटर मध्ये खत मिसळले जाते. पाण्याच्या शेवटी खत मिसळल्यामुळे खताची मात्रा पिकास पुरेपूर लागू पडते. एकूण आठ वॉल्वमार्फत १०० एकर शेती बसल्या जागेवर भिजवली जाते. सरदार यांनी या यंत्रणेमार्फत मुख्यत्वेकरून ऊस, खपली गहू, गहू, कांदा, हरभरा, भाजीपाला ही पिके घेतली आहेत. पाणी ठिबक सिंचनच्या साह्याने शेतात जात असल्याने आवश्यक तेवढेच पाणी पिकाला मिळते. दौंड तालुक्यामध्ये नदीपट्ट्यामध्ये क्षारपड जमिनीचे प्रमाण वाढत असल्याने वसुधा सरदार यांनी हा अभिनव प्रयोग राबवला आहे. सरदार यांचे या प्रयोगाला संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक शेतकऱ्यांनी भेटी दिल्या आहेत. दरम्यान, सरदार यांना बंधू डॉ. भारत करमरकर, समीर करमरकर, सचिन करमरकर यांचे सहकार्य मिळाले आहे.


शेती जास्त व मजूर संख्या तुलनेने कमी असल्याने स्वयंचलित यंत्रणा वापरण्याचा निर्णय घेतला. या यंत्रणेमुळे दर हेक्टरी उत्पादन वाढले असून खर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर बचत झाली आहे. नदीपट्ट्याच्या क्षेत्रामध्ये अनेक जमिनी क्षारपड होत आहेत, जमीन सुपीक राहण्यासाठी ही यंत्रणा महत्त्वाची आहे. ज्या शेतकऱ्यांकडे जास्त प्रमाणात शेती आहे, त्यांनी आपल्या शेतीमध्ये अशी यंत्रणा वापरात आणणे गरजेचे आहे.
- वसुधा सरदार, सेंद्रिय शेतीच्या पुरस्कर्त्या

03186

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com