मानव आणि प्राण्यांच्या संवर्धनासाठी झटताहेत दौंड तालुक्यातील छावे

मानव आणि प्राण्यांच्या संवर्धनासाठी झटताहेत दौंड तालुक्यातील छावे

Published on

प्रकाश शेलार : सकाळ वृत्तसेवा
खुटबाव, ता. ११ : निसर्ग रक्षणाची जबाबदारी खांद्यावर घेऊन दौंडच्या मातीतील सुपुत्रांनी वन विभागात मोलाचे योगदान दिले आहे. महाराष्ट्राच्या सह्याद्रीपासून ते परराज्यांतील दाट जंगलांपर्यंत या युवा अधिकाऱ्यांची सेवा पोहोचली आहे. स्वामी विवेकानंद यांचा १२ जानेवारी. जन्मदिवस. हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त दौंड तालुक्यातील काही युवक वन अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर केलेल्या कामगिरीचा घेतलेला आढावा.


दोन महिन्यांमध्ये ११० बिबट्यांना जेरबंद करणारा अधिकारी
प्रशांत खाडे, उपवनसंरक्षक अधिकारी, जुन्नर वनविभाग (मु. पो.गलांडवाडी ,ता.दौंड)
सध्या पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्याचा मानवावरती हल्ला हा सर्वाधिक संवेदनशील विषय आहे. यामध्ये जुन्नर वनविभागातील खेड, आंबेगाव, जुन्नर व शिरूर हे तालुके सर्वाधिक संवेदनशील आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या १५ वर्षांमध्ये ६० जणांनी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जीव गमावल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये विशेषतः; दोन महिन्यांपूर्वी शिरूर तालुक्यामध्ये घडलेल्या पिंपरखेड व जांबूत येथील घटना संवेदनशील होत्या. यावर उपाय म्हणून म्हणून उपवनसंरक्षक अधिकारी खाडे यांनी बिबट्यांना पकडण्याची मोहीम राबवली. गेल्या दोन महिन्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक ११० बिबटे क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या मदतीने जेरबंद केले. विशेष म्हणजे पकडलेले बिबटे इतरत्र सोडण्याची पारंपरिक पद्धती बंद केली. या बिबट्यांना माणिकडोह येथे बिबट्या बचाव केंद्रामध्ये पाठवले. तसेच भारतातील काही प्राणी संग्रहालयाशी पत्रव्यवहार करीत पकडलेल्या बिबट्यांना ताब्यात घेण्याची विनंती केली. वनतारा अभयारण्याने ५० बिबट्यांना ताब्यात घेण्याची तयारी दर्शवली आहे. आवश्यकता असल्यास परदेशात बिबटे पाठवण्याची तयारी वन विभागाने केली आहे. खाडे यांच्या या प्रयोगामुळे नागरिकांचा वनविभागाप्रतिचा संताप कमी होण्यास मदत झाली आहे. तसेच यापूर्वी चंद्रपूर येथे ताडोबा बफर अभयारण्यामध्ये खाडे हे विभागीय वन अधिकारी म्हणून कार्यरत होते. या अभयारण्याच्या प्रादेशिक क्षेत्रामध्ये १२० वाघ व ३०० गावे होती. या ठिकाणी मानव व वाघ यांच्याशी संघर्ष कमी करण्यामध्ये मोलाची भूमिका खाडे यांनी बजावल्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

वनाचे संरक्षण करताना स्वतःवर गोळीबार झालेले वनपरिक्षेत्राधिकारी-
अक्षय म्हेत्रे, साहाय्यक वनसंरक्षक, नागपूर (मु. पो. नाथाचीवाडी, ता.दौंड)
अक्षय म्हेत्रे यांनी २०१८ पासून महाराष्ट्र व मध्यप्रदेश सीमेवरील जळगाव जिल्ह्यामध्ये यावल अभयारण्यात वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून काम केले. यामध्ये त्यांनी विशेषतः जंगलाला लागणारा वणवा कमी करण्यासाठी प्रयत्न केले. म्हेत्रे रुजू झाले तेव्हा २०१८ मध्ये यावल जंगलामध्ये २२०० एकर जंगलाला वणवा लागला होता हे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना करत म्हेत्रे यांनी २०२१ मध्ये ४५० एकरांपर्यंत आटोक्यात आणले. यावल येथे ५ मे २०२० रोजी सीमेवरील मध्यप्रदेशातून साग झाडाचे लाकूड चोरण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी गावठी बंदुकीच्या साह्याने कारवाईसाठी आलेल्या म्हेत्रे व वन कर्मचाऱ्यावर फायर केल्या. सुदैवाने यामध्ये कसलीही जीवितहानी झाली नाही. प्रति हल्ल्यामध्ये वन विभागाने कारवाई करत साग लाकूड चोरणाऱ्या तीन चोरट्यांना ताब्यात घेतले. तसेच यावल येथे अभयारण्यात मृदा संधारण व्हावे म्हणून लोकसहभागातून ५००० हजार बंधारे बांधले. कर्मचाऱ्यांसाठी दत्तक झाड योजना राबवली. त्यानंतर २०२१ मध्ये म्हेत्रे यांची नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड व येवला येथे साहाय्यक वनरक्षक म्हणून निवड झाली. या काळामध्ये त्यांनी कर्मचाऱ्यांच्या साह्याने श्रमदानातून २००० वड लावले. या उपक्रमाबद्दल राज्य शासनाने त्यांना गौरविले आहे. सध्या ते नागपूर येथे साहाय्यक वनसंरक्षक म्हणून कार्यरत आहेत.


पर्यावरण संवर्धनासाठी काम करणारा अवलिया

अजिंक्य बनकर, जिल्हा वन अधिकारी, रांची, झारखंड (मु. पो. नाथाचीवाडी ता. दौंड)
अजिंक्य बनकर हे भारतीय वन सेवा (IFS) २०१७ बॅचचे अधिकारी असून सध्या ते रांची, झारखंड राज्यात कार्यरत आहेत. त्यांनी वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथून वन्यजीव व्यवस्थापन विषयात पदव्युत्तर डिप्लोमा प्राप्त केला आहे. वन्यजीव व्यवस्थापन नियोजन, जैवविविधता संवर्धन आणि विशेषतः पक्षी संवर्धन या क्षेत्रात ते सक्रियपणे कार्य करत आहेत. स्थानिक समुदायांचा सहभाग वाढावा यासाठी त्यांनी संथाली ही आदिवासी भाषा आत्मसात केली असून त्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृतीचे कार्य करत आहेत. पक्षी निरीक्षणावरती त्यांची एक डॉक्युमेंटरी प्रसिद्ध झाली आहे. पर्यावरण व पक्षीविविधतेवर आधारित बर्डस ऑफ जामताडा हे पुस्तकही प्रकाशित केले आहे. वन्य प्राणी व पक्षी यांचे दुर्मिळ फोटोंचा संग्रह करण्याचा छंद बनकर यांनी जोपासला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com