सात सदस्यांवरून 
सत्तेसाठी थोपाटले दंड

सात सदस्यांवरून सत्तेसाठी थोपाटले दंड

Published on

प्रकाश शेलार : सकाळ वृत्तसेवा
खुटबाव, ता. २७ : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यामध्ये प्रथमच भाजप ताकदीनिशी उतरली आहे. या निवडणुकीमध्ये भाजप ७३ पैकी ५८ जागा लढवत आहे. यामध्ये दक्षिण पुणे जिल्ह्यामध्ये ३५पैकी ३३, तर उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये ३८ पैकी २५ ठिकाणी भाजपचे उमेदवार रिंगणात उतरले आहेत. पुणे ग्रामीणमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजप, असा अनेक ठिकाणी सामना रंगणार आहे. मागील जिल्हा परिषदेमध्ये भाजपचे सात सदस्य होते. आगामी निवडणुकीत जादूई ३७ जिल्हा परिषद सदस्यांचा आकडा भाजप ओलांडते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे
नुकत्याच झालेल्या पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपने गड राखल्याने ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचा विश्वास दुणावला आहे. पुणे ग्रामीणमध्ये दौंडचे आमदार राहुल कुल हे भाजपचे एकमेव निवडून आलेले आमदार आहेत. त्यांच्यासोबत माजी आमदारांची कुमक असल्याने बारामती, खेड, आंबेगाव, जुन्नर वगळता प्रत्येक तालुक्यातून या निवडणुकीत भाजपने ताकदीनिशी उतरण्याचा प्रयत्न केला आहे. आमदार कुल यांच्यासमवेत माजी मंत्री बाळा भेगडे, माजी आमदार संग्राम थोपटे, माजी आमदार संजय जगताप, माजी आमदार अशोक टेकवडे, माजी आमदार शरद ढमाले, माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद, प्रदीप गारटकर, प्रवीण माने, जयश्री पलांडे, दक्षिण जिल्हाध्यक्ष शेखर वढणे, आशा बुचके, डॉ. ताराचंद कराळे यांनी आपापल्या तालुक्यामध्ये निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. पुणे शहरातून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राजेश पांडे यांनी सूत्रे हाती घेतली आहेत.
दौंड तालुक्यात सात जिल्हा परिषद जागा असल्याने सर्वाधिक अपेक्षा भाजपला दौंडमधून आहेत. इंदापूरमध्ये कट्टर विरोधक असलेले हर्षवर्धन पाटील व दत्तात्रेय भरणे यांच्या झालेल्या मनोमीलनाचा फायदा घेण्यास भाजप सज्ज झाली आहे. पुरंदरमध्ये भाजपाचा प्रामुख्याने सामना शिवसेनेची होत आहे. शिरूर व हवेलीमध्ये भाजपने ताकतीचे उमेदवार दिले आहेत. आंबेगावमध्ये दोन्ही राष्ट्रवादी व दोन्ही शिवसेना एकत्र झाल्याने भाजपची ताकद कमी झाली आहे. भोर येथे भाजप‌ विरुद्ध राष्ट्रवादीमध्ये कडवी झुंज आहे. मुळशी येथे एका गटामध्ये भाजपची ताकद चांगली आहे. मुळशी तालुक्यातील दोन्ही गटांमध्ये भाजपला राष्ट्रवादीशी सामना करावा लागणार आहे. जुन्नर येथे राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असा सामना असल्याने तालुक्यात भाजपची ताकद नगण्य आहे. खेडमध्ये भाजपने शिवसेनेशी युती करत राष्ट्रवादी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षापुढे आव्हान तयार केले आहे. वडगाव मावळमध्ये भाजप पाच जागा लढवत आहेत.

दिग्गज रिंगणात
माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या पत्नी स्वरूपा थोपटे व माजी पोपटराव गावडे यांचे पुत्र राजेंद्र गावडे, माजी जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके, गंगाराम जगदाळे यांच्या पत्नी दिव्या जगदाळे, माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या पत्नी मालतीताई पाचर्णे, आप्पासाहेब पवार आदी दिग्गज या निवडणुकीत भाजपच्या वतीने उतरले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com