शिल्प उभारून जर्सी गायीप्रति कृतज्ञता व्यक्त प्रकाश शेलार

शिल्प उभारून जर्सी गायीप्रति कृतज्ञता व्यक्त प्रकाश शेलार

Published on

खुटबाव, ता. ५ : पिंपळगाव (ता.दौंड) येथे गेली २५ वर्षांपासून दुग्ध व्यवसाय करणाऱ्या दत्तात्रेय सुतार या अल्पभूधारक शेतकऱ्याने या व्यवसायाच्या जोरावर प्रापंचिक विकासाची झेप घेतली आहे. केवळ दूध व्यवसायाच्या जोरावर कुटुंबासाठी जागा खरेदी करत त्या जागेवर नवीन बंगला बांधला आहे. तसेच पाच अपत्यांना उच्च शिक्षण देत आर्थिक स्थिरस्थावर केले आहे ज्या गायींमुळे संसारात भरभराट झाली, त्या गायीप्रति कृतज्ञता म्हणून थोरात यांनी नवीन बांधलेल्या बंगल्यावर जर्सी गायीचे शिल्प साकारले आहे.

दत्तात्रेय सुतार यांनी दोन‌ गायींपासून सुरू झालेला प्रवास आज ५० गाईंच्या गोठ्यांपर्यंत येऊन थांबला आहे. सुतार परिवार दूध डेअरीमध्ये दररोज ५०० लिटर दूध संकलन करत आहेत. गायीचे शिल्प बनवण्यासाठी सुतार यांनी ६० हजार रुपये खर्च केला आहे. हे शिल्प पाच फूट उंच, सहा फूट लांब व काळ्या पांढऱ्या शुभ्र रंगाच्या जर्सी गायीची प्रतिकृती आहे. सुतार हे उच्चशिक्षित आहेत. ते १९९७ मध्ये दहिवडी (ता. माण जि. सातारा) येथे टेक्निकल विद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करत होते. नोकरी कायमस्वरूपी नसल्याने त्यांनी कंटाळून नोकरीला राजीनामा दिला. आई तान्हुबाई, पत्नी कविता यांच्यासोबत १९९७ मध्ये दोन जर्सी गाई घेत दूध व्यवसाय सुरू केला. मिळालेल्या भांडवलातून हळूहळू व्यवसाय वाढवण्यास सुरुवात केली. गायींना चारा मिळावा म्हणून स्वतःच्या सव्वा एकर जमिनीमध्ये मका, घास, कडवळ लावण्यास सुरुवात केली. दररोज चारा शेतातून गोठ्यात आणण्यासाठी सुरुवातीस पायी, नंतर सायकल, मोटार सायकल, बैलांचा टांगा, ट्रॅक्टर या साधनांचा वापर केला. शाळेचे शिक्षण घेता घेता चार मुली व एका मुलाने दूध व्यवसाय चालवण्यास मोलाची मदत केली. मुलींनी गाईंचे शेण काढणे, गाईंच्या दूध काढणे, चारा आणणे यासाठी आई-वडिलांना मदत केली.

व्यवसायातून मुलांना उच्चशिक्षण
दूध व्यवसायातून मिळालेल्या पैशातून दत्तात्रेय सुतार यांनी अपत्यांना उच्च शिक्षण, मुलींची विवाह, गोठा व घर बांधले आहे. आज सुतार यांची दांपत्ये पूजा (शिक्षिका), आरती (प्राध्यापिका), कीर्ती (गृहिणी), भाग्यश्री (ब्युटी पार्लर), ओंकार (एम.एस्सी) उच्च शिक्षण घेत आपापल्या क्षेत्रामध्ये स्थिरस्थावर झालेल्या आहेत.


नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर नैराश्य आले होते. दूध व्यवसायात आई, पत्नी व मुलींचे योगदान मोठे आहे. उच्चशिक्षित असून देखील मुलींनी सर्व गोठा सांभाळण्याचे काम केले. आज प्रपंच फक्त गाईंमुळे उभा राहिला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यामुळे नवीन बांधलेल्या घरावर गाई प्रती कृतज्ञता म्हणून गाईचे शिल्प उभारले आहे.
- दत्तात्रेय सुतार, दुग्ध व्यावसायिक


03378

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com