अटींच्या त्रासामुळे गुन्हा नोंदविण्याकडे पाठ

अटींच्या त्रासामुळे गुन्हा नोंदविण्याकडे पाठ
Published on

प्रकाश शेलार ः सकाळ वृत्तसेवा
खुटबाव, ता. ७ : दौंड तालुक्यामध्ये २०२५- २६ या आर्थिक वर्षांमध्ये विद्युत पंप व केबल चोरीचे प्रमाण तुलनेने कमी झाल्याची माहिती यवत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली. पोलिस ठाण्यामध्ये दाखल गुन्हे कमी असले तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. आजही दौंड तालुक्यात अनेक विद्युत पंप, केबल चोरीच्या घटना घडत आहेत.
यवत पोलिसांकडे तक्रार दाखल करताना असणाऱ्या अटींमुळे अनेक शेतकरी तक्रार दाखल करण्याचा त्रास घेत नसल्याची वस्तुस्थिती आहे. ज्या शेतकऱ्याचा विद्युत पंप किंवा केबल चोरीला गेले आहे, तो संबंधित शेतकरी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यासाठी गेला असता, अनेकदा विद्युत पंप किंवा केबल विकत घेतल्याची पोलिसांकडून पावती मागितली जाते. संबंधित विद्युत पंप किंवा केबल किमान चार- पाच वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या असतात. संबंधित पावत्या शेतकऱ्यांकडे असतीलच याची शाश्वती नसते. त्यामुळे अनेकदा पोलिस स्थानकामध्ये तक्रार दाखल करण्यासाठी टाळाटाळ केली जाते.

दौंड तालुक्यात भीमा नदी, मुळा- मुठा नदी व विहिरी यावर सुमारे पाच हजार विद्युत पंपाचे जाळे पसरले आहे. यातील सर्वाधिक सुपीक तालुका म्हणून या तालुक्याला पाहिले जाते. भीमा व मुळा मोठा नदीवर १० कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधल्यानंतर खऱ्या अर्थाने नदी किनारी विद्युत पंपाचे जाळे पसरले आहे. मनुष्यवस्तीपासून लांब असल्याने विद्युत पंप व केबल चोरीच्या घटना घडतात. यामध्ये अनेक परप्रांतीय टोळ्या सक्रिय आहेत. विद्युत पंप चोरताना त्यातील तांब्याची तार चोरून नेली जाते. विद्युत रोहित्रातून ऑइल चोरी, फ्यूज चोरी आदी घटना सातत्याने घडत आहेत.

यवत पोलिस ठाण्याअंतर्गत ५० गावे आहेत. नदीकाठ व विहिरींचा परिसर असल्याने विद्युत पंप व केबल संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. तीन वर्षांपूर्वी अनेकदा शेतकरी वर्ग गुन्हा नोंदवण्यासाठी पोलिस ठाण्यामध्ये यायचे. गेली दोन वर्षांमध्ये विद्युत पंप चोरीशी संदर्भात असणारी टोळीच्या मुसक्या आवळल्याने अशा घटनांना लगाम बसला आहे. एखाद्याकडे खरेदी केल्याची पावती नसली तरी गुन्हा दाखल करता येतो.
- नारायण देशमुख, पोलिस निरीक्षक

नदीकाठच्या परिसरामध्ये अजूनही चोरीचे प्रमाण आहे. एक महिन्यापूर्वी माझ्या विद्युत पंपाची केबल चोरीला गेली यासंदर्भात केडगाव पोलिस चौकीमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी गेलो असता, मला केबल विकत घेतलेल्या दुकानातून पावत्या मागण्यात आल्या. नाइलाजाने मी माघारी आलो. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यासाठी अडथळ्याची शर्यत असल्याने अनेक शेतकरी विद्युत पंप व केबल चोरी होऊनही पोलिस ठाण्यामध्ये जात नसल्याची वस्तुस्थिती आहे.
- युवराज बोत्रे, शेतकरी, पारगाव

२०२५-२६ मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांची संख्या
केबल चोरीच्या दाखल तक्रारी- ०
विद्युत पंप चोरीचे दाखल झालेले गुन्हे- ४
उघड झालेल्या गुन्ह्यांची संख्या- ०

03501

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com