वाहनांच्या लिलावातून नऊ लाखांचा महसूल

वाहनांच्या लिलावातून 
नऊ लाखांचा महसूल
Published on

खुटबाव, ता. ६ : यवत (ता. दौंड) पोलिस ठाणे आणि पाटस चौकीतील ३०९ बेवारस वाहनांचा लिलाव बुधवारी (ता. ६) पार पडला. या प्रक्रियेतून शासनाला नऊ लाख ३५ हजार रुपयांचा महसूल मिळाला असून, वाखारी येथील फिरोज शेख यांनी सर्वाधिक बोली लावून हा लिलाव घेतला.
यवत पोलीस ठाण्याच्या आवारात बुधवारी सकाळी ११ वाजता ही प्रक्रिया राबवण्यात आली. यात १६ चारचाकी/तीनचाकी आणि २९३ दुचाकींचा समावेश होता. राज्यातील ३५ भंगार व्यावसायिकांनी यात रस दाखवला होता, मात्र कागदपत्रांच्या त्रुटींमुळे चार जणांना अपात्र ठरवण्यात आले. उर्वरित ३१ जणांमध्ये झालेल्या चुरशीच्या बोलीत ''पूना सेल्स कॉर्पोरेशन''चे फिरोज शेख यांनी ९ लाख ३५ हजार रुपयांची सर्वोच्च बोली लावली.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप गिल, अप्पर अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी पोलिस निरीक्षक नारायण देशमुख, मंडळाधिकारी सुनीता खाडे, परिवहन विभागाचे रजत कणवाटे उपस्थित होते. पोलिस उपनिरीक्षक विजय कोल्हे, सचिन साळुंखे, संतोष खरटमल व रवींद्र मोहिते यांनी नियोजनाची जबाबदारी पार पाडली.

Marathi News Esakal
www.esakal.com