‘भीमा’च्या निवृत्त कामगारांचे चक्री उपोषण
कुरकुंभ, ता. ५ : दौंड तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवृत्त कामगारांनी थकीत वेतन देण्याच्या मागणीसाठी २ ऑक्टोबरपासून चक्री उपोषण चालू केले असून, पोलिसांनी कामगारांना जमावबंदीची नोटीस बजावल्याने कामगारांनी निषेध व्यक्त केला.
भीमा साखर कारखाना २५ वर्षांच्या भाडेकराराने कर्नाटकातील निराणी ग्रुपला देण्यात आला आहे. या कारखान्याचे ४५० ते ५०० कामगार निवृत्त झाले असून, त्यांची सन २०१५ पासूनची थकीत वेतन, प्रॉव्हिडंट फंड आदी ५० कोटी रुपये देणी बाकी आहेत. ही देणी न दिल्याने या निवृत्त कामगारांनी २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीपासून कारखाना प्रवेशद्वारासमोर चक्री उपोषण चालू केले आहे. हा उपोषणाचा तिसरा दिवस आहे. चक्री उपोषण करणाऱ्या निवृत्त कामगारांना कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करून पोलिसांनी जमावबंदीची नोटीस बजावली आहे. ‘आम्ही लोकशाही मार्गाने कष्टाचे पैसे मिळवण्यासाठी आंदोलन करत असून, ते हुकूमशाही मार्गाने मोडून काढण्यासाठी जमावबंदीची प्रयत्न केला जात आहे,’ अशी शब्दांत कामगारांनी निषेध केला.
चक्री उपोषणास बसलेले निवृत्त कर्मचारी वेगवेगळ्या शारीरिक व्याधींनी व वयोवृद्ध झाल्याने अनेक अडचणींना तोंड देत आहेत. ते कुठून कायदा सुव्यवस्था बिघडू शकतात, असा प्रश्न ज्येष्ठ कामगारांनी उपस्थित केला. निवृत्त कर्मचारी वेगवेगळ्या आजारांना तोंड देत असून त्यांना उपचारासाठी पैसेही नसल्याची खंत उपोषणकर्त्यांनी व्यक्त केली. ५०पेक्षा जास्त निवृत्त कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून, त्यातील काही जणांना उपचारासाठी पैसे नसल्याने व तणावामुळे मृत्यू झाला आहे. याला सर्वस्वी कारखाना प्रशासन व संचालक जबाबदार असल्याचे मत निवृत्त कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले. हे थकीत वेतन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचा ठाम निर्णय उपोषणकर्त्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला. कारखाना व्यवस्थापनाने लवकरात लवकर थकीत देणे न दिले आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल, असा इशारा निवृत्त कामगारांनी दिला. या निवृत्त कामगारांना आंदोलनादरम्यान काही झाल्यास कारखाना प्रशासन व संचालक मंडळ जबाबदार असेल, असा इशारा कामगारांनी दिला आहे. या आंदोलनात सर्व निवृत्त कर्मचारी सहभागी झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

