बनकरवाडी- गलांडवाडी पुलाच्या कामाला मिळणार गती

बनकरवाडी- गलांडवाडी पुलाच्या कामाला मिळणार गती

Published on

लोणी देवकर, ता. १३ : इंदापूर तालुक्यातील पळसदेवमधून येत पुढे वरकुटे बुद्रुक, बनकर वाडी, गलांडवाडी ते इंदापूरकडे जाणाऱ्या मार्गावरील पुलाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून रखडला होता. या मार्गावर पुलाची मागणी करण्यात येत होती. मागील दोन वर्षापासून रस्त्याची मंजुरी मिळून बहुतांश रस्त्याचे काम पूर्ण झाले. मात्र, या मार्गावरील बनकरवाडी ते गलांडवाडीदरम्यान उजनी पाणलोट क्षेत्रात भीमा नदीवरून रस्ता जोडणीसाठी पुलाची आवश्यकता होती. पुलाची आवश्यकता लक्षात घेत क्रीडामंत्री दत्तात्रेय भरणे यांनी पुलासाठी ६४ कोटी रुपये निधी मंजूर केला. त्यामुळे या पुलाचे काम लवकरात लवकर मार्गी लागणार असल्याने स्थानिक नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.
या रस्त्याअभावी इंदापूर तालुक्यातील उजनी पाणलोट क्षेत्रालगतच्या वरकुटे बुद्रुक, अगोती नं. १, अगोती नं. २, करेवाडी, बनकरवाडी, कळाशी, गंगावळण, कालठण, भावडी, चांडगाव या गावांना इंदापूर शहरात जाण्याचा अधिकचा प्रवास करावा लागत होता. रस्ता झाल्यामुळे आता इंदापूरला जाण्याचा या गावातील नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे. पूर्वी नागरिकांना इंदापूरला जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाचा वापर करावा लागत होता. शेतकऱ्यांना शेतीमाल बाजारपेठ, मच्छीमार व्यवसाय, विद्यार्थ्यांचे शिक्षण, प्रशासकीय कामानिमित्त इंदापूर शहरात जाण्यासाठी लोकांना लागणारा अधिकचा पाच ते सात किलोमीटरचा प्रवास वाचणार आहे. रस्त्या आणि पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांचा वेळ आणि इंधन दोन्ही वाचणार आहे.
रस्त्याचे काम टप्प्याटप्प्यांमध्ये मागील दोन वर्षापासून सुरू आहे. पहिल्या टप्प्यात पळसदेव ते वरकुटे बुद्रुक हा रस्ता पूर्ण झाला आहे. दुसरा टप्पा इंदापूर ते गलांडवाडी हे काम देखील पूर्णत्वास आलेले आहे. या दोन्ही रस्त्यांच्या जोडण्यासाठी उजनी धरणातील भीमा नदी पात्रावरून पुलाची आवश्यकता होती. त्यानुसार भरणे यांनी ६४ कोटी निधी मंजूर केला.

उजनी धरणाच्या स्थापनेपूर्वी हा रस्ता वापरात होता. नंतर धरणाची पाणी पातळी वाढल्याने हा रस्ता वापरण्यातून बंद झाला. आता होत असलेल्या नवीन पुलामुळे उजनीकाठच्या दहा ते बारा गावांचे दळणवळण सुखकर होऊन अपघाताचे प्रमाण कमी होणार आहे. शेतकरी आणि मच्छीमारांना या पुलाचा सर्वात जास्त फायदा होणार आहे. करमाळा तालुक्यातील पारेवाडी या ठिकाणाहून इंदापूरला येणाऱ्या प्रवाशांना हा सर्वात जवळचा मार्ग असल्यामुळे इंदापूरची आर्थिक उलाढाल देखील वाढण्यास मदत होणार आहे.
- गणेश राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com