साथीच्या आजारांनी फणफणला उजनीकाठ
लोणी देवकर, ता. २५ ः इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये सर्दी, खोकला, ताप यासारख्या आजाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. डेंगी, मलेरिया, चिकुनगुनिया, गॅस्ट्रो व ताप यासारख्या आजारांची लक्षणे ग्रामस्थांमध्ये दिसून येत आहेत. वातावरणातील बदलामुळे साथीचे आजार सर्वत्र पसरत असल्याने काळजी घेण्याचे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.
पावसाचा लहरीपणा, वातावरणातील थंडी, ऊन, वारा, पाऊसमिश्रीत विचित्र हवामानाचा फटका सध्या वृद्धासह महिला, पुरुष व लहान मुलांना बसताना दिसत आहे. ज्यामुळे ग्रामस्थ ताप, सर्दी, खोकल्याने बेजार झाले आहेत. पावसाने काहीशी विश्रांती घेतल्यानंतर साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. ज्यामुळे वरकुटे बुद्रुक (ता. इंदापूर) परिसरातील अनेक नागरिकांना दवाखान्याची वाट धरावी लागत आहे.
पाऊस थांबल्यावर वाढलेली उष्णता, तर कधी पावसाचा निर्माण होणारा गारवा डासांच्या उत्पत्तीसाठी पोषक वातावरण तयार होत आहे. पाणी साठण्याच्या ठिकाणी डास अंडी घालत असून, त्यापासून डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. पावसाचे पाणी टायर, करवंट्या, भंगार आदींमध्ये साठते. त्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन डेंगी व हिवतापाच्या रुग्णांत वाढ होत आहेत.
पावसाची उघडझाप, वातावरणाचा लहरीपणा, डासांची वाढती उत्पत्ती यामुळे साथीच्या आजाराने ग्रामस्थ हैराण झाले आहेत.
ग्रामस्थांनी बाहेरील पदार्थ खाणे टाळावे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. वापराच्या पाण्याचा वापर नियमित भरणा करावा. आजार रोखण्यासाठी जनजागृती आवश्यक असून, पावसाचे साचून राहिलेले पाणी, कचरा व अडगळीची ठिकाणे परिसर स्वच्छ ठेवावा. मोकळे भूखंड व मोकळी मैदानावरील गवताची विल्हेवाट लावावी. कोणताही आजार अंगावर न काढता डॉक्टरांशी संपर्क साधून लवकरात लवकर उपचार घ्यावेत.
- डॉ. नितीन राऊत, वरकुटे बुद्रुक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.