उजनी धरणात परदेशी मत्स्यप्रजातींचे बस्तान
संदीप बल्लाळ : सकाळ वृत्तसेवा
लोणी देवकर, ता. १ : उजनी धरणात परदेशी प्रजातींमधील दक्षिण अमेरिकन ‘सकरमाउथ’ मासा, तिलापिया (चिलापी) आणि मांगूर या प्रजाती स्थानिक माशांवर विपरीत परिणाम करत आहेत. पाणथळ क्षेत्रात परदेशी मत्स्यप्रजातींनी आपले बस्तान बसवले आहे. काही डोंगरी प्रवाहात आढळणाऱ्या स्थानिक माशांच्या प्रजाती आता लोप पावत आहेत, असे संशोधकांनी केलेल्या नोंदीवरून स्पष्ट झाले आहे.
उजनीतील मत्स्यप्रजातींचे सर्वेक्षण करून संधोकांनी लिहिलेला शोधनिबंध नुकताच ‘जर्नल ऑफ थ्रेटनेड टॅक्सा’ या आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकामध्ये प्रकाशित झाला आहे. संशोधकांनी उजनी जलाशयामधून गोड्या पाण्यातील माशांच्या ५६ प्रजातींची नोंद करतानाच ब्रह्मपुत्रा आणि गंगा नदीच्या खोऱ्यात आढळणाऱ्या मत्स्यप्रजातीदेखील प्रथमच उजनीतून नोंदविण्यात आल्या आहेत. यानिमित्ताने उजनीच्या मत्स्यवैविध्याचा दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा वैज्ञानिक अभ्यास केला आहे. यानुसार नोंद केलेल्या ५६ प्रजातींपैकी आठ प्रजाती या कृष्णा नदीखोऱ्याला प्रदेशनिष्ठ असून सहा प्रजाती या ‘आययूसीएन’च्या ‘लाल यादी’त समाविष्ट आहेत.
भीमा नदीवरील उजनी धरण हे अत्यंत महत्त्वाचे मानवनिर्मित पाणथळ क्षेत्र आहे. पक्षी स्थलांतराच्या मध्य आशियाई उड्डाणमार्गावरून स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांसाठी हे महत्त्वाचे क्षेत्र आहे. या क्षेत्राला ‘महत्त्वपूर्ण पक्षी क्षेत्रा’चा (आयबीए) दर्जा दिला आहे.
दरम्यान, वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करण्यासाठी एप्रिल २०२१ ते मार्च २०२३ या कालावधीत पार पडलेल्या सर्वेक्षणात संशोधकांना जलाशयात ३९ वंश, १८ कुल आणि १२ गणातील माशांच्या प्रजाती आढळल्या. ‘पारआंबसिस लाला’ ही गंगा व ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यात आढळणारी आणि ‘गॅगेटिक लीफफीश’ ही गंगेच्या खोऱ्यात आढळणारी प्रजात प्रथमच उजनी जलाशयात आढळल्याची नोंद संशोधकांनी केली आहे.
अति प्रमाणात होणारी मासेमारी, पर्यटन, वाळूउपसा, औद्योगिक सांडपाणी व प्रदूषणामुळे जलाशयातील परिसंस्थेवर ताण वाढत आहे.
मत्स्यविविधतेचा या संशोधकांकडून अभ्यास
उजनीतील मत्स्यविविधतेचा आढावा घेण्यासाठी डॉ. रणजित मोरे (इंदापूर महाविद्यालय, इंदापूर), गणेश मारकड (मॉडर्न कॉलेज, पुणे), डॉ. विनोद काकडे (दिवेकर कॉलेज, वरवंड) आणि प्रा. डॉ. जीवन सरवडे (प्राचार्य, इंदापूर महाविद्यालय, इंदापूर) यांनी संयुक्तपणे अभ्यास केला.
सर्वेक्षणातील महत्त्वपूर्ण नोंदी
- भारतातच सापडणाऱ्या ‘कोलूस बार्ब’, ‘पेनिस्युलर ऑस्टियोब्रामा’, ‘भीमा ऑस्टियोब्रामा’ आणि ‘नुक्ता’ या प्रजाती या सर्वेक्षणामधून नोंदविल्या.
- ‘नुक्ता’ ही प्रजात ‘आययूसीएन’च्या ‘लाल यादी’त ‘संकटग्रस्त’ (एन्डेंजर्ड) प्रजात म्हणून नामांकित केली.
- ‘पिरापिटिंगा’ ही प्रजात सर्वेक्षण काळात कमी संख्येत आढळली,
- ‘मोझांबिक तिलापिया’ ही परदेशी प्रजातीची सर्वाधिक संख्या
या प्रजातींचा आढळल्या नाहीत
यापूर्वीच्या सर्वेक्षणात आढळलेल्या लोच प्रजातीमधील ‘शिस्टुरा डेनिसोनी’, ‘गुंटिया लोच’, ‘नेमाचेलस बोटिया’ या प्रजाती आणि काही डोंगरी प्रवाहात आढळणाऱ्या ‘मलबार बारील’, ‘भारतीय हिल ट्राउट’ आणि ‘डे बारील’ या प्रजाती आताच्या सर्वेक्षणात आढळून आल्या नाहीत.
उजनीत नोंदवलेल्या स्थानिक व संकटग्रस्त प्रजातींचे संवर्धन, परकीय माशांवर नियंत्रण आणि मत्स्यव्यवस्थापनासाठी ठोस उपाययोजना हवीत. यामुळे उजनी जलाशयातील मत्स्यवैविध्याचे अद्ययावत चित्र समोर आले आहे. भविष्यातील जैवविविधता व मत्स्यसंवर्धन धोरणांसाठी हा महत्त्वाचा दस्तऐवज ठरणार आहे.
- डॉ. रणजित मोरे, संशोधक
64240, 64235,64237, 64240
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

