
अनोळखी महिलेला मंचरमध्ये मायेचा आधार
मंचर, ता. १२ : एकलहरे (ता. आंबेगाव) येथे पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत शनिवारी (ता. ११) रात्री आठ वाजता ३५ वर्षांची अनोळखी महिला पायी जात होती. थकल्याने ती रस्त्याच्या कडेलाच झोपली होती. ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्था प्रतिनिधी, ग्रामस्थ व पत्रकारांनी प्रसंगावधान राखून या महिलेला माणुसकीच्या नात्याने मदत केली व मंचर पोलिसांकडे सुपूर्त केले. ती काहीच बोलत नसल्यामुळे तिची ओळख पटत नाही.
रस्त्याच्या जवळ रात्री एक महिला झोपल्याचे पत्रकार अय्युब शेख, डॉ. सुहास कहडणे, सुशील कहडणे, अमोल जाधव, अनंत तायडे, निखिल तायडे, बाळासाहेब भालेराव यांनी पाहिले. रस्त्याने वाहने ये-जा करत होती. महिलेला अपघात होण्याचा धोका होता. तिच्या सुरक्षिततेसाठी शेख यांनी ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेशी संपर्क केला. त्यांनी ताबडतोब मंचर पोलिसांना सदर माहिती कळविली. पोलिस निरीक्षक सतीश होडगर व सहायक पोलिस निरीक्षक किरण भालेकर यांनी ताबडतोब ठाणे अंमलदार सुदाम घोडे, हरिभाऊ नलावडे, अविनाश दळवी, शर्मिला होले, पूजा गरगोटे- पिंगळे यांना घटनास्थळी पाठविले. पोलिसांना व नागरिकांना पाहून महिला घाबरली. तिला मराठी, हिंदी भाषा समजत नव्हती. खाणाखुणा करून तिला समजविले. तिला पाणी व बिस्कीटचा पुडा दिला. मंचर पोलिस ठाण्यात आणल्यानंतर तिची भोजन व राहण्याची व्यवस्था केली. रविवारी (ता. १२) तिला ज्ञानशक्ती विकास वाहिनीच्या अर्चना टेमकर यांनी ड्रेस दिला. पोलिस हवालदार तुकाराम मोरे, पोलिस नाईक अश्विनी लोखंडे महिलेला घेऊन ससून रुग्णालयात गेले आहेत. तेथे ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी सदर महिलेला तातडीची वैद्यकीय मदत मिळवून देण्याविषयी वैद्यकीय अधिकारी डॉ. मानसिंग साबळे यांना सूचना दिल्या. सदर महिलेला दाखल करून घेतले असून, डॉ. निशिकांत थोरात याच्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार सुरु केले आहेत.
MAC23B07689