‘सीट’ मिळविण्यासाठी दोन मित्र एकाच मोटारीत!

‘सीट’ मिळविण्यासाठी दोन मित्र एकाच मोटारीत!
Published on

मंचर, ता. ३ : सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील व शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शनिवारी (ता. २) सव्वातास चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. एकेकाळच्या दोन मित्रांमध्ये तब्बल वीस वर्षानंतर काय चर्चा झाली, हे जरी गुलदस्तात आहे. मात्र, आगामी शिरूर लोकसभा निवडणुकीसाठी व्यूहरचना झाल्याची चर्चा आहे.
लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजू लागले आहे. या पार्श्वभूमीवर शिरूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्यामुळे आढळराव पाटील यांच्यापुढे मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. लांडेवाडी या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी, ‘जर राष्ट्रवादी काँग्रेसने मला विचारणा केली व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रीन सिग्नल दिल्यास राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास मी तयार आहे,’ असे जाहीर करून आपला चेंडू राष्ट्रवादी काँग्रेसच्या मैदानात टाकला आहे. लोकसभा निवडणुकीला अत्यंत कमी दिवस शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर आढळराव पाटील यांनी जुन्या मित्राला साद घातली आहे. तसेच, बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे वळसे पाटील व आढळराव पाटील हे नेते गेल्या आठ महिन्यांपासून एकमेकांना प्रतिसाद देत असल्याचे पाहावयास मिळते.
दरम्यान, श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधीस्थळ भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. हा कार्यक्रम संपल्यानंतर वळसे पाटील यांच्या वाहनामध्ये आढळराव पाटील बसले. अन्य कुणी कार्यकर्ते वाहनात नव्हते. अवसरी फाट्यापर्यंत यायला तब्बल सव्वातास वेळ लागला. अवसरी फाटा येथे आल्यानंतर आढळराव पाटील हे त्यांच्या वाहनात बसून लांडेवाडीला व वळसे पाटील हे मंचरला मार्गस्थ झाले. एकत्र प्रवास केल्याच्या माहितीला आढळराव पाटील यांनी दुजोरा दिला.

‘दादा, नवीन घड्याळ बांधा’
मंचर येथे गेल्या महिन्यात एका कार्यक्रमप्रसंगी शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी, ‘दादा, आता हातातील घड्याळ जुने झाले आहे, नवीन घड्याळ बांधा.’ असे सूचक वक्तव्य केले होते. त्याला आढळराव पाटील यांनी स्मितहास्य करून दाद दिल्याचेही उपस्थितांच्या नजरेतून सुटले नाही. तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोमवारी (ता. ४) मंचरला येणार आहेत. त्यांचे स्वागत आढळराव पाटील हेही करणार आहेत. त्यामुळे त्यांचे व राष्ट्रवादी काँग्रेसचे सूत जमू लागले आहे. एकंदरीत घड्याळाच्या दिशेने त्यांची पावले पडत असल्याची व जुन्या मैत्रीला पुन्हा बहर येणार असल्याची चर्चा सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com