वडगाव काशिंबेगला खुलेआम वाळू उपसा

वडगाव काशिंबेगला खुलेआम वाळू उपसा
Published on

मंचर, ता. ३ : श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग व चिंचोडी देशपांडे (ता. आंबेगाव) येथील घोड नदीच्या पात्रातून विनापरवाना बेकायदा वाळूमाफिया टोळ्यांकडून खुलेआम वाळू उपसा सुरू आहे. महसूल विभाग या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने बेकायदा वाळू उपसा जोरात सुरू आहे. त्यामुळे नदीतील पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. दहशतीमुळे येथील नागरिक तक्रार देण्यासाठी धजावत नाहीत.
मंचरच्या पश्चिमेला पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या घोड नदीच्या काठावर श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग व चिंचोडी देशपांडे ही दोन गावे आहेत. यापूर्वी वाळू तस्करांच्या विरोधात आवाज उठविल्याने एका स्थानिक पत्रकाराला वाळू माफिया टोळीकडून मारहाण झाली होती. प्रसार माध्यमांनी आवाज उठविल्यानंतर काही दिवस वाळू उपसा थांबला होता. तसेच, तीन महिन्यांपूर्वी दोन वाळू टोळ्यांमध्ये तुंबळ मारामारी झाली. त्यामध्ये पोकलेन जाळून टाकण्यात आला. पण, एवढे होऊनही या टोळ्यांमध्ये समझोता झाला. त्यामुळे पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी कोणीही आले नाही. या परिसरातील स्थानिक तीन जण व अन्य सात ते आठ जण, अशी वाळू तस्करीची टोळी कार्यरत आहे. महसूल खाते व पोलिस यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याने प्रसार माध्यमांनीची याकामी पुढाकार घ्यावा, अशी मागणी नाव न छापण्याच्या अटीवर येथील काही ग्रामस्थांनी केली आहे.
रात्रभर येणाऱ्या वाहनांच्या आवाजाने नागरिक हैराण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम झाला आहे. अवजड वाहनांमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे. अतिरिक्त वाळू उपशामुळे भविष्यात नव्याने बांधकाम झालेल्या पुलाला धोका होऊ शकतो.


अशी चालते वाळू तस्करी
• कोल्हापूर पद्धतीचा बंधाऱ्याच्या जवळ दिवसा जेसीबी, इतर यंत्रसामग्री व ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळू काढून ढीग लावला जातो.
• संध्याकाळी सातनंतर हायवा व अन्य वाहनांतून वाळू वाहतूक केली जाते.
• घोड नदीमध्ये वाहने ये-जा करण्यासाठी वाळू तस्करांनी रस्ता तयार केला आहे.
• दररोज सरासरी ४० ते ५० ब्रास वाळू तस्करी होत आहे.

श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग व चिंचोडी देशपांडे या कार्यक्षेत्रात घोड नदी पत्रात झालेल्या वाळू उपशाचे पंचनामे केले जातील. वाळू तस्करांवर कारवाई केली जाईल. रात्री गस्त घालण्यासाठी महसूल खात्याचे पथक कार्यरत केले जाईल.
- संजय नागटिळक, तहसीलदार, आंबेगाव


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com