मंचर परिसरात बिबट्याची दहशत

मंचर परिसरात बिबट्याची दहशत
Published on

मंचर, ता. ११ : मंचर (ता. आंबेगाव) शहराच्या कार्यक्षेत्रात असलेल्या लोंढेमळा वस्तीजवळ गुरुवारी (ता. १०) सकाळी सव्वादहा वाजता बिबट्याचे नागरिकांना दर्शन झाले. शेतकरी ऋषिकेश अरुण लोंढे यांनी मोबाईलमध्ये कैद केलेला बिबट्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. गुरुवारी रात्री बिबट्याने प्राथमिक शाळेजवळ असलेल्या मेंढपाळाच्या कळपात असलेल्या मेंढीची शिकार केली. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामतः शेतीच्या कामावर येण्यास व उसाला व अन्य पिकला पाणी भरण्यासाठी मजूर नकार देतात. सुट्टीनिमित्त पाहुणे देखील मंचरला येण्यास टाळाटाळ करतात. बिबटे जेरबंद होईपर्यंत शेतीच्या कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मंचर शहराचा विस्तार तीन ते चार किलोमीटर व्यासामध्ये आहे. १५ दिवसांपूर्वी मोरडेवाडीत वनखात्याने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद केले आहे. यापूर्वी या भागात बिबट्याचा वावर व हल्ले संध्याकाळी किंवा रात्री झालेले आहेत. पण, सध्या बिबट्यांचा मुक्त संचार वाढला आहे.
येथील सेवानिवृत्त शिक्षक भास्कर लोंढे म्हणाले, ‘‘मंचर शहर व परिसरात जवळपास प्रत्येक वस्तीवर दोन बिबट्यांचा वावर आहे. ऊसतोडणी झाल्याने त्यांना कुठेही लपण नाही. त्यामुळे त्यांचे दररोज दर्शन होत आहे. एकूण बिबट्यांची संख्या बारा ते पंधरा असावी. सध्या बिबट्याची दहशत या भागात कायम आहे.’’

मंचर परिसरात दररोज पंधरा हजार लिटरहून अधिक दुधाचे संकलन होत आहे. संकरित गायींच्या गोठ्याला संरक्षणासाठी लोखंडी जाळ्या शेतकऱ्यांनी बसविल्या आहेत. पण शेतात पाणी भरणे, गवत कापणे व गोठ्यापर्यंत गायींना चारा नेण्यासाठी मजूर मिळत नाहीत. बिबट्याचा वावर व उपद्रव न थांबल्यास दुध व्यवसाय अडचणीत येऊ शकतो.
- बाबाजी दत्तात्रेय खानदेशे, दूध उत्पादक शेतकरी, लोंढेमळा-मंचर (ता. आंबेगाव)

उन्हाळ्याची सुट्टी, यात्रा लग्नसराईचा हंगाम सुरु झाला आहे. पण बिबट्याचा वावर दिवसा वाढला आहे. भीतीमुळे पाहुणे मुलांना सुट्टीसाठी मंचरला पाठविण्यास टाळाटाळ करतात. वनखात्याने विशेष मोहीम राबवून प्रत्येक वाडी-वस्तीवर दोन पिंजरे लावून सर्व बिबटे जेरबंद करावेत.
- पल्लवी लक्ष्मण थोरात भक्ते, माजी ग्रामपंचायत सदस्य, मंचर (ता. आंबेगाव)

गेल्या दोन वर्षात मंचर परिसरात ११ बिबटे मंचर वनपरिक्षेत्र कार्यालयाने जेरबंद केले आहेत. मोटारसायकल वरून ये-जा करताना आठ ते दहा जण जखमी झाले आहेत. एका बिबट्याचे फिरण्याचे कार्यक्षेत्र सरासरी चार ते पाच किलोमीटर असते. लहान मुलांची काळजी घ्यावी.
- संभाजीराव गायकवाड, वनपाल, (ता. आंबेगाव)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com