पर्यावरणासह पारंपरिक देशी वाणांचे होणार संवर्धन
मंचर, ता.२ : नागरिकांचे आरोग्य टिकवणे, पर्यावरणपूरक शेतीला चालना देणे व पारंपरिक देशी वाणांचे संवर्धन करणे या उद्देशाने ‘ज्ञानशक्ती विकास वाहिनी’ संस्थेने पुढाकार घेतला आहे. मंचर (ता. आंबेगाव) येथून महाराष्ट्र जीन बँक प्रकल्पांतर्गत या उपक्रमाची सुरुवात आंबेगाव तालुक्यात केली आहे. पहिल्या टप्प्यात ५० शेतकऱ्यांना देशी भाजीपाला व कडधान्यांच्या मोफत बियाण्यांचे वाटप सुरू करण्यात आले आहे.
बीजमाता पद्मश्री राहिबाई पोपेरे यांच्याकडून उपलब्ध झालेले हे बियाणे शाश्वत शेतीच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. याबाबत माहिती देताना ज्ञानशक्ती संस्थेचे प्रकल्प अधिकारी प्रा. सलमान शेख म्हणाले, “सध्या अधिक उत्पादनासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर करत आहेत. यामुळे माणसांच्या आरोग्यावर तसेच जमिनीच्या सुपीकतेवर गंभीर परिणाम होत आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबासाठी तरी दहा गुंठे क्षेत्रात रासायनिक मुक्त देशी वाणांची शेती करावी. याबाबत संस्थे मार्फत गावोगावी जनजागृती सुरु आहे.”
या उपक्रमांतर्गत सोमवारी (ता.२) नारायण तुळशीराम टाव्हरे(निरगुडसर), किसन नाथा लोंढे (एकलहरे), दिनेश शंकर भोर (शिंदेवाडी) व भाऊसाहेब कोंडाजी शिंदे (कारेगाव) या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात बियाण्यांचे वाटप करण्यात आले.
दरम्यान खेड, जुन्नर व शिरूर तालुक्यांतील शेतकऱ्यांना या उपक्रमात सहभागी करून घेतले जाणार आहे.
शेतीमध्ये रासायनिक घटकांचा वापर टाळून निसर्गाशी सुसंगत शेती पद्धती अंगीकारल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवता येतेच, पण आरोग्यदृष्ट्या सुरक्षित अन्नधान्य मिळवणे शक्य होते. यासाठी गावागावांमध्ये जनजागृती मोहिमा राबवण्यात येत आहेत.
- रोहित थोरात, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्था, मंचर
शेतकऱ्यांनी बियाण्यांसाठी मंचर (ता. आंबेगाव) येथील डी.एस.के. प्राइड इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील संस्थेच्या कार्यालयात, आय.सी.सी.आय. बँकेशेजारी संपर्क साधावा किंवा ९३५६१४१६७६ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.
- अपेक्षा वाघुले, देशी वाण जनजागृती प्रमुख ज्ञानशक्ती संस्था.
याचा होणार फायदा
- रासायनिक मुक्त शेतीला प्रोत्साहन
- जमिनीची सुपीकता वाढवणे
- पर्यावरणपूरक शेतीस चालना
उपलब्ध देशी वाण
नाचणी, ज्वारी, तूर, भात, मटकी, हुलगे, वाल, भेंडी, गवार, दोडका, कराले, मेथी, पालक, आंबटचुका, चंदनबटवा, अभई इत्यादी.
13319
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.