पेठ- एकलहरे टप्पा मृत्यूचा सापळा
डी. के. वळसे पाटील : सकाळ वृत्तसेवा
मंचर, ता. १३ : खेड ते सिन्नर राष्ट्रीय महामार्गावर आंबेगाव तालुक्यातील पेठ ते एकलहरे या दरम्यान अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. तीन वर्षांत १०७ अपघातात झाले असून, त्यात ७२ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. तर ८९ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी ४१ जणांना कायमचे अपंगत्व आले आहे. गेल्या आठवड्यात एकलहरे येथे झालेल्या अपघातात एक युवती व एका युवकाचा मृत्यू झाला. त्यामुळे हा प्रश्न ऐरणीवर आला असून, या भागातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
पेठ व एकलहरे ही दोन ठिकाणे भीषण अपघाताची केंद्र व मृत्यूचा सापळा म्हणूनच ओळखली जातात. पेठ गावाच्या दक्षिण व उत्तर या दोन्ही बाजूला बाह्यवळण आहे. पुणे व मंचरच्या बाजूने आल्यानंतर पेठ गाव व सातगाव पठार भागाकडे जाताना झालेल्या सहा अपघातांत सहा जणांचा मृत्यू, पाच जण जखमी व तीन जणांना दिव्यांग प्राप्त झाले आहे. मंचरहून जाणारी वाहने एकलहरे चौकातून भरधाव नारायणगावच्या दिशेने जातात. रस्त्यावर गतिरोधकाची सोय नाही. तसेच, बाह्यवळण सेवारस्त्याचे कामही प्रलंबित आहे. एकलहरे बाह्यवळणावर कळंब व महाळुंगे पडवळ आदी गावांकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडताना २२ अपघातात २४ जणांचा मृत्यू झाला असून, ३८ जण जखमी आहेत. त्यापैकी २० जणांना दिव्यांग प्राप्त झाले आहे.
‘सल्लागार कंपनीच्या चुका’
खेड ते सिन्नर रस्त्यावर बाह्यवळण झालेल्या ठिकाणी सुरुवातीला व शेवटी जुन्या रस्त्यांना जोडताना अनेक ठिकाणी नागरिक व वाहनचालकांना महामार्ग ओलांडावा लागतो. त्यामुळे अनेकदा अपघात झालेले आहेत. महामार्ग आराखडा तयार करणाऱ्या सल्लागार कंपनीच्या झालेल्या चुकांमुळे नारायणगाव येथे खोडद रस्त्यावरील चौकात अनेकदा अपघात झाले. तीन जणांचा मृत्यू झाल्यानंतर तेथे आता पुलाचे काम सुरू झाले आहे. त्याचप्रमाणे तुकाई चौकातून राजगुरुनगरकडे जाणारा पूल मंजूर झाला असून, त्याची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे, असे खेड ते सिन्नर राष्ट्रीय महामार्गाचे समन्वयक दिलीप मेदगे यांनी सांगितले.
एकलहरे येथे भुयारी किंवा उड्डाणपूल व घोड नदीपर्यंत दोन्ही बाजूने पथरस्ता होण्यासाठी रविवारी (ता. १५) सकाळी ११ वाजता काळ्या पट्ट्या लावून एकलहरे चौकाचे नामांतर ‘मौत का कुवा’ (मृत्यूसापळा चौक) असे करण्यात येईल. मंगळवारी (ता. १७) सकाळी ११ वाजता रस्ता रोको आंदोलन केले जाईल. याप्रकरणी खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील व प्रशासनाने लक्ष घालावे, अन्यथा आंदोलन तीव्र करावे लागेल.
- बाबाजी चासकर, अध्यक्ष, हुतात्मा बाबू गेणू सैद प्रतिष्ठान
पेठ, एकलहरे व आळेफाटा बाह्यवळण संपते तेथील चौकात उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग झाल्यास अपघात रोखता येतील. या मार्गावरील सर्व उपाययोजनांच्या कामाची एकत्रित निविदा करण्याची विनंती केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना करणार आहे.
- दिलीप मेदगे, समन्वयक, खेड ते सिन्नर राष्ट्रीय महामार्ग
शिंदेवाडी, एकलहरे, लोंढेमळा, साकोरे महाळुंगे पडवळसह नऊ गावांतील विद्यार्थी, शेतकरी व नागरिकांना एकलहरे चौक जीव मुठीत धरूनच ओलांडावा लागतो. होणाऱ्या अपघातांची वाट न पाहता प्रशासनाने युद्ध पातळीवर उपाययोजना हाती घ्याव्यात.
- अशोकराव मोढवे, माजी सरपंच, साकोरे (ता. आंबेगाव)
अपघातांची संख्या दृष्टीक्षेपात
पेठ ते कळंब अंतर- १४ किलोमीटर
सन २०२२ ते १० जून २०२५पर्यंत झालेले अपघात : १०७
गंभीर अपघात संख्या : ४५
जखमी व्यक्ती संख्या : ८९
एकूण मृत्यू संख्या : ७२
एकलहरे- कळंब बाह्यवळण
एकूण अपघात संख्या : २२
गंभीर अपघात संख्या : १५
जखमी व्यक्ती संख्या : ३८
एकूण मृत्यू संख्या : २४
पेठ बाह्यवळण
एकूण अपघात संख्या : ६
गंभीर अपघात संख्या : २
जखमी व्यक्ती संख्या : ३
एकूण मृत्यू संख्या : ६
या उपाययोजना गरजेच्या
• पेठ गावाच्या पश्चिमेला व दक्षिण बाजूला बाह्यवळणाच्या ठिकाणी भुयारी मार्ग किंवा उड्डाणपूल.
• तांबडेमळा गायमुख नंदी चौकात गतिरोधक व सिग्नल
• एकलहरे चौकात उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग.
• वेग मर्यादेवर नियंत्रण ठेवण्यासाठी रमलर स्ट्रिप्स व स्पीड सीसीटीव्ही कॅमेरे, चेक पोस्ट.
• धोकादायक वळणांवर रिफ्लेक्टर व वॉर्निंग साईनचा प्रभावी वापर
• ओव्हरलोडेड वाहनांवर कठोर कारवाई .
• अल्कोहोल टेस्टिंगसाठी विशेष पथके
• विनापरवाना व विना हेल्मेट प्रवास होऊ नये म्हणून जनजागृती,
• स्थानिक पातळीवर वाहनचालकांसाठी रस्ता सुरक्षितता कार्यशाळा
• शाळा, महाविद्यालये व ग्रामपंचायतीमार्फत जनजागृती मोहीम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.