सलून व्यावसायिकाचा मुलगा नीट परीक्षा उत्तीर्ण
मंचर, ता. २४ : साध्या सलून व्यवसायातून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबातील मुलगा यश किरण क्षीरसागर याने आपल्या जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमाच्या जोरावर नीट (NEET) परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. त्याने डॉक्टर होण्याच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे. सामाजिक परिस्थितीच्या मर्यादा झुगारून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणाऱ्या यशच्या या यशस्वी प्रवासामुळे मंचर परिसरात कौतुक केले जात आहे.
श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग (ता. आंबेगाव) येथील सलून व्यावसायिक किरण क्षीरसागर व विजया क्षीरसागर यांचा यश हा मुलगा. परिस्थिती अत्यंत गरिबीची असून वडील दिवसभर सलून व्यवसाय चालवितात व आई शेतमजूर म्हणून काम करते.
यशचे प्राथमिक शिक्षण मंचर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पाचवी ते बारावीचे शिक्षण महात्मा गांधी विद्यालयात झाले. शालेय जीवनातच त्याच्या मनात डॉक्टर होण्याचे स्वप्न रुजले होते. मावस भाऊ दत्ता राऊत यांच्या मार्गदर्शनाने नीट (NEET) परीक्षेची माहिती मिळाली. सुरुवातीचे दोन प्रयत्न अपयशी ठरले पण यश ने हार न मानता पुणे येथील ‘लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट’ (LFU) या संस्थेच्या मोफत कोचिंग क्लाससाठी मुलाखत दिली व निवड झाल्यानंतर वर्षभर दररोज बारा तास अभ्यास करत अखेर यश मिळविले.
लहानपणापासून मानवी शरीराची गोडी, विज्ञानाची आवड व इतरांना मदत करण्याची जिद्द यामुळे डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगले होते. निट (NEET) परीक्षेत ३९२ गुण मिळवत मी माझ्या ध्येयाचा पाठपुरावा केला. दोन वेळा अपयश आले. पण मी खचून गेलो नाही. नियमित बारा तास अभ्यास केला. तिसऱ्या प्रयत्नात अधिक जोमाने तयारी करून अखेर यश संपादन केले आहे. आईवडील, आशुतोष कुंभार, प्रतीक्षा शिंदे व चैतन्य भांगे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
- यश किरण क्षीरसागर
आमचं कुटुंब फारच साधं आहे. सलूनवर उभं राहून दिवस जातो. मुलगा यश रात्री-अपरात्री अभ्यास करत होता. आर्थिक अडचणी होत्या, पण त्याचं मनोबल खच्ची होऊ दिलं नाही. तिसऱ्या प्रयत्नात यशस्वी झाला. मेहनत वाया जात नाही. आम्ही आयुष्यभर झगडलो, पण त्याने आमचं नाव उज्ज्वल केलं. आता तो समाजासाठी काम करेल. तो डॉक्टर होणार हे ऐकून डोळ्यांत पाणी आलं. हा माझ्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे.
- किरण काळूराम क्षीरसागर, वडील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.