विमा कंपनीच्या फसवणूकप्रकरणी मंचर पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा
मंचर, ता. ७ : अपघाताच्या खोट्या घटनेतून विमा कंपनीकडून भरपाई रक्कम मिळवण्यासाठी खोटी फिर्याद दाखल करणाऱ्या चौघांवर मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात मृताच्या वारसांनी आणि इतर आरोपींनी संगनमताने खोटे साक्षीदार उभे करून पोलिसांची आणि विमा कंपनीची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे, अशी माहिती मंचर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी दिली. या प्रकरणात किरण सुरेश आवटे (रा. महाळुंगे पडवळ, ता. आंबेगाव), शिवाजी जिजाराम काळोखे (रा. कडूस ता. खेड), नामदेव मारुती बोऱ्हाडे (रा. जऊळके खुर्द, ता. खेड), विठ्ठल विष्णू कदम (रा. एकलहरे, ता. आंबेगाव) या चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. विमा कंपनीचे सल्लागार मुझम्मिल अर्शद शेख यांनी या प्रकरणी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ फेब्रुवारी २०१९ रोजी सुरेश त्रिपती आवटे (रा. महाळुंगे पडवळ) हे दुचाकीवरून जात असताना अपघात होऊन जखमी झाले होते. त्यानंतर उपचार घेत असताना ५ मार्च २०१९ रोजी त्यांचा मृत्यू झाला. यानंतर त्यांचा मुलगा किरण आवटे याने ३१ मार्च २०१९ रोजी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करत अपघातास कंटेनर (एमएच १४ एफटी ३६६६) जबाबदार असल्याचे नमूद केले. या तक्रारीच्या आधारावर कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पुढील तपासात व विमा कंपनीच्या चौकशीत आढळून आले की, हा अपघात कोणत्याही इतर वाहनामुळे नव्हता, तर मयत सुरेश आवटे यांचा दुचाकी घसरून पडल्यामुळे झाला होता. तरीही त्यांच्या कुटुंबीयांनी खोट्या साथीदारांच्या मदतीने खोटा दावा तयार करून आयसीआयसीआय लोमबार्ड जीआयसी या विमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळवण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुनील धनवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.