दिव्यांग शिक्षकांची मुंबईला धावपळ
मंचर, ता. १५ : पुणे जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या ४०९ दिव्यांग प्राथमिक शिक्षकांना वैद्यकीय प्रमाणपत्र पडताळणीसाठी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात पाठविण्यात येत असल्याने शिक्षक वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या प्रक्रियेमुळे शिक्षकांना मुंबईला जावे लागणार असून, तेथे वेळेत तपासणी न झाल्यास मुक्काम करावा लागतो. एकट्या दिव्यांग व्यक्तीसाठी हा प्रवास आणि खर्च त्रासदायक ठरत असल्याने शासनाच्या धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
‘‘राज्य शासनाच्या १६ जून २०२५ च्या परिपत्रकानुसार दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी तालुकास्तरावरील त्रिसदस्यीय (गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी) समितीमार्फत करण्याचे निर्देश आहेत. मात्र, प्रत्यक्षात जिल्हा परिषदेमार्फत या आदेशाची अंमलबजावणी न करता शिक्षकांना मुंबईला पाठविले जात आहे.’’ असे महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे आंबेगाव तालुका अध्यक्ष शैलेंद्र चिखले यांनी सांगितले.
पुणे जिल्हा परिषदेकडून ८ जुलै २०२५ ला सर्व विभाग प्रमुखांना ससून रुग्णालयात तपासणीसंदर्भात सूचना दिल्या होत्या. मात्र ससून प्रशासनाने फेरतपासणीस नकार दिला. परिणामी जे.जे. हॉस्पिटल हा पर्याय सुचविण्यात आला.
याबाबत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील म्हणाले, दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या फेर तपासण्या करण्याची मागणी एका दिव्यांग संघटनेने केली. त्यामुळे ससून रुग्णालयात दिव्यांग्यांची तपासणी करण्याविषयी पत्र दिले. परंतु त्यांनी पूर्वी तपासणी केली असल्याने पुन्हा त्यांची तपासणी करण्याविषयी रुग्णालयाने असमर्थता दर्शवली. त्यामुळे जे.जे. हॉस्पिटल, मुंबई यांच्याकडे पत्र व्यवहार केला आहे. पण दूरवर जाणे व तेथे तपासणी करून घेणे दिव्यांग शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने गैरसोयीचे आहे. त्यामुळे संबंधितांची तपासणी जिल्हा शल्य चिकित्सक, औंध, पुणे येथे करण्याविषयी प्रयत्न सुरू आहेत. दिव्यांगांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.