लोकशाहीरांच्या कार्याचा आजही समाजाला आदर्श
मंचर, ता. ६ : मराठी साहित्यात दलित व वंचितांच्या व्यथा मांडणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या लेखणीने व शाहिरीने सामाजिक समतेसाठी अखंड लढा दिला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला स्फूर्ती देणाऱ्या त्यांच्या कार्याचा आजही समाजाला आदर्श आहे, असे मत युगप्रवर्तक प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खरात यांनी व्यक्त केले.
पेठ (ता.आंबेगाव) येथील सामाजिक न्याय विभागाच्या निवासी शाळेत अण्णा भाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त युगप्रवर्तक प्रतिष्ठान व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक व संविधान भवन समिती, आंबेगाव तालुका यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इयत्ता दहावीच्या परीक्षेत १०० टक्के निकालाची परंपरा राखणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक मनोज जाधव यांनी स्वागत केले. यावेळी गौतम रोकडे, विठ्ठल टिंगरे, खंडू थोरात, एकनाथ वाव्हळ, राहुल टाव्हरे, विशाल कांबळे, शिक्षक जितेंद्र खोसे, टी.ए. सय्यद, प्रज्ञा भाईक, गुरुनाथ कोयते, ए.आर.. मुळे, ए.टी. खबूतरे उपस्थित होते.