मंचर उपजिल्हा रुग्णालयातील जेवण, नाष्टा बंद
मंचर, ता. १८ : आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात मुक्कामी थांबणाऱ्या रुग्णांना दररोज मिळणारा नाश्ता, चहा व दोन वेळचे भोजन मंगळवार (ता. १९) पासून बंद होणार आहे. जेवणपुरवठा करणाऱ्या रेणुका महिला बचत गटाचे तब्बल आठ लाख रुपये थकले आहेत. या कामाचे मुख्य ठेकेदार कैलास फूड्स (सातारा) गेल्या महिनाभरापासून फोनही उचलत नाहीत. त्यामुळे जेवणपुरवठा बंद करत असल्याचे पत्र महिला बचत गटाच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयाला देण्यात आले आहे. यामुळे दूरवरून उपचारासाठी येणाऱ्या व मुक्कामी थांबणाऱ्या रुग्णांचे मोठे हाल होणार आहेत.
राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत अनेक वर्षांपासून बाळंत महिला, अपघातग्रस्त तसेच इतर गंभीर आजारांनी त्रस्त रुग्णांना मोफत चहा, नाश्ता व दोन वेळचे भोजन पुरवले जाते. या जेवणाचा खर्च सातारा येथील कैलास फूड्स या ठेकेदार यांना दिला जातो. या ठेकेदाराने मंचर येथे रेणुका महिला बचत गटाला जेवण पुरवण्याचे काम सोपवले होते. रेणुका महिला बचत गटाच्या अध्यक्षा अरुणा टेके यांनी सांगितले की, मार्च २०२४ पासून आजपर्यंत कैलास फुड्सने एकाही पैशाचे बिल दिलेले नाही. सुमारे आठ लाख रुपये थकीत आहेत. पैशाअभावी दुकानदारांचे तगादे सुरू झाले आहेत. त्यानीही किराणामाल देणे बंद केले आहे. बचत गटातील चार महिलांचे पगार मला देता आले नाहीत. गेल्या महिनाभरापासून ठेकेदाराशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते फोन उचलत नाहीत. मानसिक त्रास होत असल्याने मी मंगळवारपासून जेवणपुरवठा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. याची माहिती मंचर उपजिल्हा रुग्णालयाला दिली आहे."
दरम्यान, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य निळूभाऊ काळे व जगदीश घिसे यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की," येथे दररोज ७०-८० रुग्ण मुक्कामी राहतात. ठेकेदार व महिला बचत गट यांच्यात समन्वय घडवून आणावा. मुक्कामी थांबणाऱ्या रुग्णांचे जेवण बंद होणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी."
रुग्णांचे जेवण बंद होणार असल्याचे रेणुका महिला बचत गटाचे पत्र प्राप्त झाले आहे. याबाबत कैलास फूड्सच दिलीप मेहेत्रे या ठेकेदाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांच्याशी संपर्क झाला नाही. हा प्रकार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप पानगव्हाणे यांना कळविला आहे. अत्यंत अवघड प्रश्न निर्माण झाला असून यातून मार्ग काढण्यासाठी रुग्णालयाच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत.
- डॉ. शिवाजीराव जाधव प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, मंचर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.