बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरडीचा मृत्यू
मंचर/टाकळी हाजी, ता.१२ : पिंपरखेड (ता.शिरूर) येथे रविवारी (ता.१२) सकाळी पावणेदहाच्या सुमारास बिबट्याने केलेला हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शिवन्या शैलेश बोंबे (वय साडेपाच) या मुलीचा मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचारापूर्वीच मृत्यू झाला. दरम्यान, भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.
मृत शिवन्या आजोबा अरुण देवराम बोंबे यांच्यासमवेत शेजारील शेतात पिण्याचे पाणी देण्यासाठी जात होती. त्यावेळी शेजारील उसाच्या पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक तिच्यावर झडप घातली. आजोबांनी आरडाओरडा करत तिच्या दिशेने धाव घेतल्याने बिबट्याने शिवन्याला सोडून ऊसात पलायन केले. बिबट्याच्या हल्ल्यात शिवन्याच्या मानेवर गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याची माहिती मंचर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवाजीराव जाधव यांच्यास वैद्यकीय पथक उपचारासाठी तयार होते. पण रुग्णालयात येण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यावेळी तीच्या समवेत असलेले वडील शैलेश, आई दिव्या व चुलते प्रफुल्ल यांना त्यामुळे मानसिक धक्का बसला. सध्या शैलेश व दिव्या यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, सहाय्यक वनरक्षक अधिकारी स्मिता राजहंस, शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी नीलकंठ गव्हाणे, मंचरचे वनपरिक्षेत्र विकास भोसले, मंचरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर व पोलिस नाईक तानाजी हगवणे यांनी रुग्णालयात येऊन कुटुंबीयांना धीर देत रीतसर पंचनामा केला.
बुधवारी मंत्रालयात बैठक
पिंपरखेड येथे लहान मुलीवर बिबट्याकडून झालेल्या हल्ल्याची माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. यापुढे अशा घटना घडू नयेत म्हणून त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क केला आहे. त्यानुसार बुधवारी (ता.१५) मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबई मंत्रालय येथे बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला वनखात्याचे उच्च पदस्थ अधिकारी व या भागातील काही प्रमुख ग्रामस्थ उपस्थित राहून तातडीच्या उपाययोजना हाती घेतल्या जाणार आहेत.
एका कुटुंबाचे स्वप्न भंगले
शिवन्याचे वडील शैलेश बोंबे हे सर्वसामान्य शेतकरी असून, पिंपरी येथे लहानसा व्यवसाय करतात. पत्नी दिव्या, दोन लहान मुली, आई-वडील असा त्यांचा सुखी संसार होता. मोठी मुलगी शिवन्या अंगणवाडीत शिकत होती व लवकरच पहिलीत प्रवेश घेणार होती. “मुलगी शिकून अधिकारी होईल,” असे स्वप्न पालकांनी पाहिले होते; परंतु या दुर्दैवी घटनेमुळे बोंबे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पिंपरखेड परिसरात दररोज वाडीवस्त्यांवर बिबट्यांचे दर्शन होत असून, शेतकरी अक्षरशः जीव मुठीत धरून शेतात काम करतात. शाळकरी मुलांबाबत पालकांमध्ये तीव्र चिंता आहे. शासन व वनविभागाने बिबट्यांची वाढती संख्या रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी.
- राजेंद्र दाभाडे, सरपंच, पिंपरखेड (ता. शिरूर)
14337
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.