बिबटमुक्तीसाठी पुढचे पाऊल

बिबटमुक्तीसाठी पुढचे पाऊल

Published on

मंचर, ता. ४ : ‘‘उत्तर पुणे जिल्ह्यात दोन हजार बिबट्यांचा वावर आहे. पाचशे बिबट ‘वनतारा’मध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्त्वत: मान्यता दिली आहे. ५०० पिंजरे व अन्य साहित्य खरेदीसाठी ११ कोटी २५ लाख रुपये निधी तातडीने मंजूर केला असून, तातडीच्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे मानव व बिबट संघर्ष टळेल,’’ असे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.
मुंबई-मंत्रालय येथे मंगळवारी (ता. ४) बिबट- मानव संघर्षावर नियंत्रण आणण्यासाठी माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पुढाकाराने मंत्रालयात गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी वनविभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास राव, पुणे विभाग वनसंरक्षक आशिष ठाकरे, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल, जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे व अन्य अधिकारी उपस्थित होते.
यावेळी वळसे पाटील म्हणाले, “काही वर्षांत बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये ५३ नागरिकांचा मृत्यू, १४५ नागरिक गंभीर जखमी व २६ हजार ९७९ पशुधनांचा बळी गेला आहे. हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे.’’ माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही वाढत्या बिबट समस्यांमुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे शाळांमधील पट संख्येवर व शेतातील कामावर मोठा परिणाम झाला आहे. तातडीच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली.
दरम्यान, सर्व निर्णयांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी वनमंत्री नाईक बुधवारी (ता. १२) दुपारी तीन वाजता विधान भवन, पुणे येथे लोकप्रतिनिधींसमवेत बैठक घेणार आहेत.

बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
• बिबटे पकडण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अलर्ट सिस्टिम व सौर ऊर्जा कुंपण उभारण्याचा निर्णय.
• पकडलेले बिबटे पुन्हा परिसरात सोडले जाणार नाहीत. वनतारा येथे स्थलांतरित करणार.
• बिबट्यांची नसबंदीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविणार. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळ दिल्लीला जाणार.
• विदर्भातील वाघ-मानव संघर्ष रोखण्यासाठी वापरलेल्या उपाययोजना आता उत्तर पुणे जिल्ह्यात राबविण्यात येणार.
• श्यामाप्रसाद मुखर्जी सौर कुंपण योजनेंतर्गत शेतकऱ्यांना १०० टक्के सवलत.
• वनखात्यातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांना मागणी प्रमाणे साहित्य देण्याचा निर्देश.
• ‘स्पेशल लेपर्ड फोर्स’ स्थापना.
• बिबट अनुसूची (१) मधून काढून अनुसूची (२) मध्ये आणण्यासाठी केंद्र शासनाकडे विनंती.
• बिबट प्रवण क्षेत्रातील शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा देण्याचा निर्णय.


बिबट्याकडून वाढत्या हल्ल्यांच्या प्रश्नाबाबत वळसे पाटील सतत माझ्या संपर्कात आहेत. परिसर बिबटमुक्त होण्यासाठी वनविभागाकडून या भागात आवश्यक ती कामे युद्धपातळीवर केली जातील. परिसर भयमुक्त करण्यासाठी प्रशासन जनतेबरोबर आहे.
- गणेश नाईक, वनमंत्री, महाराष्ट्र राज्य.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com