बिबट्यांच्या दहशतीने रात्रीचा प्रचार गोठला
मंचर, ता.२५ : मंचर नगरपंचायत निवडणूक प्रचाराला गती आली आहे. पण मंचर शहराच्या चहूबाजूने बिबट्यांचा वावर वाढला आहे. बिबट्यांच्या दहशतीमुळे रात्री सात नंतर होणाऱ्या प्रचारावर मर्यादा आली आहे. “दिवसा प्रचाराला या, रात्री येऊ नका.” असे निरोप वाड्यावस्त्यांवरून उमेदवार व त्यांच्या समर्थकांना दिले जात आहेत.
मंचर नगरपंचायत नगराध्यक्ष पद महिलेसाठी राखीव असून एकूण सहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर १६ नगरसेवक पदाच्या जागांसाठी विविध पक्षाचे व अपक्ष असे एकूण ६२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सर्वच उमेदवारांनी जनसंपर्क मोहीम तीव्र केली आहे. शहरातील गृहनिर्माण संस्थांमध्ये घरोघरी भेट व चिन्ह वाटप मोहीम तीव्र करण्यात आली आहे.
मतदारांचा शोध
विशेषतः मतदार यादीत नाव असलेल्या पण पुणे, मुंबई व अन्य शहरात सध्या राहत असलेल्या मतदारांशी संपर्क साधून तुमच्या जाण्या-येण्याचा खर्च दिला जाईल, तसेच मतदानाच्या दिवशी तुमच्या व्यवसायाचे किंवा गैरहजेरीचाही मोबदला दिला जाईल. असे सांगून मतदानाला येण्याविषयी आग्रह केला जात आहे. त्यासाठी स्वतंत्र कार्यकर्त्यांची टीम जवळपास प्रत्येक उमेदवाराने तयार केली आहे.
मतदारांची बडदास्त
अनेक उमेदवारांनी कार्यालय थाटली असून मतदार व कार्यकर्त्यांना खूष ठेवण्यासाठी , हॉटेलमध्ये पसंतीनुसार व्हेज नॉनव्हेज जेवण दिले जात आहे. कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाला चहा व शुद्ध पाणी देऊन त्याची चौकशी केली जाते. नगराध्यक्षपद तसेच नगरसेवकांच्या नऊ पदांसाठी महिला आरक्षण असल्याने निवडणूक प्रचारात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पक्षाचे ध्वज हातात घेऊन आणि पक्षाच्या चिन्हाचे स्कार्फ परिधान करून कार्यकर्ते उत्साहात प्रचारात गुंतले आहेत.
सोशल मीडियाचा प्रभावी वापर
उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांमध्ये परस्पर टीकासत्रालाही चांगलेच उधाण आलेले दिसत आहे. या निवडणुकीत सोशल मीडियाचा प्रभावी आणि व्यापक वापर होत आहे. त्यामध्ये व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, फेसबुक व माहिती पत्रकांचा वापर केला जात आहे. लक्षवेधक प्रचारगीते प्रसारित करण्यासाठी तसेच चिन्हाची ओळख मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध वाहनांवर ध्वनिक्षेपकांची व्यवस्था करण्यात आली आहे.
फ्लेक्सबंदीच्या नियमांकडे दुर्लक्ष
मंचर शहरात गेली तीन वर्षे फ्लेक्सबंदी लागू असूनही, निवडणूक प्रचाराच्या काळात अनेक ठिकाणी उमेदवारांनी मोठमोठे फ्लेक्स लावल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे फ्लेक्सबंदीच्या नियमांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याची चर्चा शहरात जोरदार सुरू आहे.
पाच बिबटे व चार बछड्यांचा वावर
भेकेमळा, लांडकमळा, मोरडेवाडी, मुळेवाडी, माळवाडी, खानवस्ती, जुना चांडोली रस्ता, एस कॉर्नर, महात्मा गांधी विद्यालय, बाणखेलेमळा या भागात अनेकांना बिबट्याचे दर्शन झाले आहे. बिबट्याने शेळ्या, मेंढ्यांवर हल्ले केल्याचा व कुत्री फस्त केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. जवळपास चार ते पाच बिबटे व चार बछड्यांचा वावर असल्याने रात्री वाड्यावस्त्यांवर होणाऱ्या प्रचार बैठकांना मर्यादा आल्याचे काही उमेदवारांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

