बिबट्याच्या रक्तरंजित अध्यायाची पुनरावृत्ती

बिबट्याच्या रक्तरंजित अध्यायाची पुनरावृत्ती

Published on

डी. के. वळसे पाटील : सकाळ वृत्तसेवा

मंचर, ता. १८ : जुन्नर, शिरूर आणि आंबेगाव तालुक्यांत बिबट्याच्या दहशतीने जनजीवन विस्कळित झाले आहे. निष्पाप लहान मुले, महिला आणि नागरिक नरभक्षक बिबट्याचे बळी ठरत आहेत. शाळेचा रस्ता असुरक्षित झाला आहे. शेतीत जाणे धोक्याचे झाले आहे आणि रात्रीची शांतता भयकथेप्रमाणे थरकाप उडवणारी बनली आहे. पण, हा इतिहासाचा पहिलाच धडा नाही. यापूर्वीही सुमारे ८०-८१ वर्षांपूर्वी, ब्रिटिश राजवटीच्या काळात आंबेगाव व खेडच्या पश्‍चिमेला, भीमाशंकरच्या घनदाट जंगलात याहूनही भयानक नरभक्षक बिबट्यांची दहशत पसरली होती. केवळ दोन वर्षांत तब्बल १०० जणांचा बळी गेला होता. त्या काळात आंबेगावचे सुप्रसिद्ध शिकारी तात्या ऊर्फ इस्माईल इनामदार यांनी १२ नरभक्षक बिबट्यांना ठार करून संपूर्ण परिसराला दिलासा दिला होता. त्यांच्या पराक्रमाची दखल घेत ब्रिटिश सरकारने त्यांचा सन्मान केल्याचे दस्तऐवज आजही उपलब्ध आहेत.

ब्रिटिश राजवटीच्या काळात, सुमारे ८१ वर्षांपूर्वी (१९४३–४४) आंबेगाव व खेड तालुक्याच्या पश्चिमेकडील आदिवासी व दुर्गम भागात नरभक्षक बिबट्यांनी भीषण दहशत निर्माण केली होती. सलग दोन वर्षांत या बिबट्यांच्या हल्ल्यांत सुमारे १०० पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद स्थानिक कथनांसह ब्रिटिशकालीन प्रशासकीय दस्तऐवजात आढळते. ठाणे व पुणे जिल्ह्याच्या सरहद्दीवरील भीमाशंकर परिसर त्या काळी घनदाट जंगलांनी व्यापलेला होता. आदिवासी पाड्यांतील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण होते. दैनंदिन कामांसाठी जंगलात जाणेही जिवावर बेतत होते. मृत्यूंची संख्या वाढत चालल्याने ब्रिटिश प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर मुंबई राज्याचे तत्कालीन डेप्युटी पोलिस कमिशनर पी. बी. विल्किन्स यांनी ३० जुलै १९४४ रोजी नरभक्षक बिबट्यांना ठार मारण्याचे आदेश दिल्याचा उल्लेख काही जुन्या शासकीय नोंदींमध्ये आढळतो.


नरभक्षक बिबट्याचा इतिहास
स्थळ : आंबेगाव–खेड तालुक्याचा पश्चिम आदिवासी पट्टा
कालखंड : १९४३–१९४४
मानवी बळी : सुमारे १००
ठार केलेले नरभक्षक बिबटे : १२


‘भीमाशंकरचा नरभक्षक’
या घटनेबाबत माहिती देताना वन्यजीव अभ्यासक व निसर्ग लेखक सुरेशचंद्र वारघडे यांनी ब्रिटिशकालीन प्रशासनाची कार्यपद्धती स्पष्ट केली. ते म्हणाले, वारघडे यांनी १९८५ ते १९८८ या कालावधीत या भागातील बिबट्यांच्या हल्ल्यात बळी गेलेल्या कुटुंबांतील ज्येष्ठ व्यक्तींशी चर्चा केली होती. तसेच, नरभक्षक बिबट्यांना ठार करणारे आंबेगावचे प्रसिद्ध शिकारी (स्व.) तात्या ऊर्फ इस्माईल हशम इनामदार यांचे चिरंजीव सय्यद भाई इनामदार यांच्याशीही त्यांनी सविस्तर संवाद साधला होता. या माहितीच्या आधारे आणि ब्रिटिश सरकारच्या पोलिस अधिकाऱ्यांच्या दस्तऐवजांच्या आधारे ‘भीमाशंकरचा नरभक्षक’ हे पुस्तक १९९० मध्ये प्रसिद्ध झाले. त्यातील एक भाग १९८६ च्या ‘सकाळ दिवाळी’ अंकात प्रसिद्ध झाला होता.


भीमाशंकर परिसरातील नरभक्षक बिबट्यांच्या दहशतीला आळा घालण्यात प्रथम श्रेणीचे शिकारी इस्माईल हशम इनामदार (तात्या) यांनी निर्णायक भूमिका बजावली. ते व्यवसायाने हिरड्याचे व्यापारी असले तरी शिकारीतील प्रावीण्यामुळे त्यांची ब्रिटिश प्रशासनाने विशेष नियुक्ती केली होती. पोलिस उपआयुक्त (डेप्युटी पोलिस कमिशनर) पी. बी. विल्किन्स यांच्या आदेशानुसार इस्माईल इनामदार यांनी १२ नरभक्षक बिबटे ठार केले. त्यानंतरच भीमाशंकर परिसरात खऱ्या अर्थाने शांतता प्रस्थापित झाली. त्यांच्या समवेत
‘वाघ्या’ नावाचा कुत्रा नेहमी असायचा. या घटनेची नोंद आजही ब्रिटिश काळातील दस्तऐवजांमध्ये उपलब्ध आहे. याबाबत माहिती त्यांचे चिरंजीव व माझे वडील सय्यद कासम इनामदार यांनी वेळोवेळी ही हकिकत कुटुंबीयांना सांगितलेली आहे. त्यांचा फोटो ही आमच्याकडे उपलब्ध आहे
- बादशहा इनामदार, इस्माईल इनामदार यांचे नातू (मंचर, ता. आंबेगाव)

ब्रिटिश काळात बिबट्याच्या हल्ल्यामुळे होणाऱ्या मृत्यूंची नोंद वनविभाग व पोलिस खात्यामार्फत स्वतंत्रपणे ठेवली जात असे. आंबेगाव-भीमाशंकर पट्ट्यात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात होता. स्थानिक बोलीभाषेत बिबट्यालाही ‘वाघ’ असे संबोधले जात होते. आदिवासी पाड्यांतील मृत्यूंची संख्या वाढल्याने मुंबईहून थेट नरभक्षक ठार मारण्याचा आदेश निघणे ही त्या काळातील प्रशासकीय पद्धत होती.
- सुरेशचंद्र वारघडे, वन्यजीव अभ्यासक व निसर्ग लेखक

नायफड गावी माझे वडील मुरलीधर सहादू जोशी हे लहान असल्याने रात्री आईच्या कुशीत झोपले होते. त्यांची बहीण अंजनाबाई सहादू जोशी (वय 3) आई रखमाबाई यांच्या शेजारी झोपली होती. रात्री तिला बिबट्याने उचलून नेले. त्यावेळी सकाळी शोध सुरू केला.फक्त बांगड्या व हाताचा पंजाच मिळाला. हा थरारक प्रसंग माझे वडील मुरलीधर (वय ८२) हे आजही आम्हाला सांगत आहेत.
- डॉ. राहुल जोशी, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय तळेघर (ता.आंबेगाव)

4821, 4822

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com