आंबेगाव तालुक्याची हरित क्रांतीकडे वाटचाल
डी. के. वळसे पाटील, मंचर
आंबेगाव तालुका हा डोंगराळ, माळरान व कोरडवाहू भाग म्हणून ओळखला जातो. बदलत्या हवामानामुळे पावसाचे प्रमाण कमी होत चालले असून भूजल पातळीही चिंताजनक अवस्थेत पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी, डोंगराळ व माळरान जमीन ओलीताखाली आणण्यासाठी आणि भावी पिढीसाठी नैसर्गिक साधनसंपत्ती जपण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था पुढाकार घेत आहेत. यामध्ये १४ ट्रीज फाउंडेशन, वेताळे आणि ज्ञानशक्ती विकास वाहिनी, मंचर या संस्थांचे योगदान विशेष उल्लेखनीय ठरत आहे.
रोप लागवड व संवर्धनामुळे पावसाचे प्रमाण वाढते, भूजल पातळी सुधारते आणि पर्यावरणाचा समतोल राखला जातो, ही बाब लक्षात घेऊन या संस्थांनी केवळ रोपे लावण्यापुरते मर्यादित न राहता संपूर्ण परिसंस्थेचा विचार करून काम हाती घेतले आहे. ज्या गावांमध्ये रोप लागवड केली जात आहे, त्या गावांमध्ये पावसाचे पाणी अडवण्यासाठी तळी, तलाव, बंधारे, चर खोदकाम आदी कामे ग्रामस्थांना विश्वासात घेऊन केली जात आहेत. त्यामुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवले जाऊन ते जमिनीत मुरण्यास मदत होत आहे. १४ ट्रीज फाउंडेशनचे संस्थापक प्रवीण भागवत, व्यवस्थापक अनंत तायडे हे सातत्याने गावोगावी जाऊन रोप लागवड व संवर्धनाच्या कामाला प्राधान्य देत आहेत. त्यांच्या कार्यात केवळ जनजागृती नाही, तर प्रत्यक्ष कृतीवर भर दिला जात आहे. पारगाव तर्फे खेड, तालुका आंबेगाव येथे तब्बल ६० एकर डोंगराळ माळरान हिरवेगार करण्याचे महत्त्वाकांक्षी काम त्यांनी हाती घेतले आहे. या कामासाठी स्थानिक मजुरांना रोजगारही उपलब्ध करून देण्यात आला असून, त्यामुळे पर्यावरण संवर्धनासोबतच ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळत आहे. ग्रामपंचायत व ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभत आहे. राजगुरुनगर रोटरी क्लबचे अध्यक्ष राजेंद्र जांभळे यांची ही या कमी मोलाची साथ लाभली.
असे केले रोप लागवड
आंबेगाव तालुक्यात १४ ट्रीज फाउंडेशनच्या वतीने मोठ्या प्रमाणावर रोप लागवड व वाटप उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत अवसरी गायरान येथे १८ हजार ३३ रोपांची लागवड करण्यात आली असून ५ टँकर व १० मजुरांच्या साहाय्याने सुमारे ६० एकर क्षेत्रावर काम करण्यात आले आहे. पारगाव तर्फे खेड येथे १० हजार ४६८ रोपांची लागवड ३ टँकर व १२ मजुरांच्या माध्यमातून ३४ एकर क्षेत्रावर करण्यात आली आहे. पेठ येथे २० हजार ११२ रोपांची लागवड करून ७ टँकर व ८ मजुरांच्या मदतीने ६७ एकर क्षेत्र विकसित करण्यात आली आहे. पवळे वस्ती पेठ येथे १ हजार ३४६ रोपांची लागवड करून ४.४८ एकर क्षेत्रावर काम करण्यात आले. लोणी येथे १६ हजार २५४ रोपांची लागवड ५ टँकर व १२ मजुरांच्या साहाय्याने ५४.१८ एकर क्षेत्रावर करण्यात आली. धामणी येथे ४ हजार ७३२ रोपांची लागवड १५.७७ एकर क्षेत्रावर करण्यात आली आहे.
सर्वच ठिकाणी वृक्ष लागवड
आंबेगाव तालुक्यातील विविध शाळा, महाविद्यालये, स्मशानभूमी, पोलिस ठाणे, बस स्थानके व सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रोपवाटप व वृक्ष लागवड करण्यात आली आहे. जि.प. प्राथमिक शाळा लोणी, श्री भैरवनाथ विद्यालय लोणी, गावडेवाडी जिल्हा परिषद शाळा, नवखंड विद्यालय, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पारगाव, पारगाव तर्फे खेड स्मशानभूमी परिसर, पारगाव पोलिस ठाणे परिसर, हनुमान विद्यालय गंगापूर बुद्रुक, मंचर नगरपंचायत परिसर, पिंपळगाव रस्ता, पुणे-नाशिक महामार्ग, आळेफाटा महामार्ग पोलिस केंद्र, अण्णासाहेब आवटे महाविद्यालय मंचर, बस स्थानक परिसर आदी ठिकाणी रोप लागवड करण्यात आली आहे. या उपक्रमांमुळे संपूर्ण तालुक्यात हरित क्षेत्रात लक्षणीय वाढ होत आहे.
नारळाचे गाव विकसित करण्याचा निर्णय
ऑटोमेक कंपनीचे ही पर्यावरण संवर्धनासोबत ग्रामीण विकासाचा समन्वय साधणारे उपक्रम हाती घेतले आहेत. आदर्श कुरवंडी येथे ऑटोमेक कंपनीच्या सहकार्याने व ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्था यांच्या पुढाकारातून हे गाव ‘नारळाचं गाव’ म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अंतर्गत सुमारे ४९०
कुटुंबांना प्रत्येकी चार नारळाची झाडे व एक चिकूचे झाड लागवडीसाठी दिले जाणार आहे. त्यासाठी कुटुंबप्रमुखांनी घराजवळ किंवा शेतामध्ये खड्डे खोदण्याचे काम सुरू केले आहे. या झाडांपासून प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी २० ते २५ हजार रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळेल, असा अंदाज आहे.
केटी बंधाऱ्यांचे नियोजन सुरू
वेळ नदीवर कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे नियोजन सुरू असून येत्या काही दिवसांत कामास सुरुवात होणार आहे. त्यामुळे परिसरातील ३० ते ४० विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन मोठ्या प्रमाणात कोरडवाहू क्षेत्र ओलीताखाली येणार आहे. पिण्याचे पाणी व शेतीसाठी या बंधाऱ्यांचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. आदर्श कुरवंडी गावात रात्रीच्या वेळी आवश्यक असलेल्या ठिकाणी दहा सोलर दिवे बसविण्यात आले असून, अंत्यविधी व दशक्रिया विधीसाठी सोलरवर चालणाऱ्या गरम पाण्याच्या सुविधेचेही नियोजन करण्यात आले आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी सिमेंट बाकड्यांची व्यवस्था केली जाणार आहे.एकूणच १४ ट्रीज फाउंडेशन व ज्ञानशक्ती विकास वाहिनी यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आंबेगाव तालुका पर्यावरण संवर्धन, जलसंधारण, रोजगारनिर्मिती व शाश्वत ग्रामीण विकासाच्या दिशेने ठोस पावले टाकत आहे.
राज्यस्तरावर प्रथम क्रमांकाचा पुरस्कार
भागडी गावाने केलेल्या या आदर्श कार्याची दखल राज्य पातळीवर घेण्यात आली असून गावाला व या प्रकल्पात सहभागी संस्थेला राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय राज्य व देश पातळीवरील अनेक मान्यवरांनी गावाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली असून या विकास कार्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
आदर्शगाव भागडी झाले पाणीदार
आंबेगाव तालुक्यातील आदर्श गाव भागडी हे गाव एकेकाळी दुष्काळी गाव म्हणून ओळखले जात होते. पावसावर अवलंबून शेती, पिण्याच्या पाण्याची टंचाई, रोजगारासाठी मोठ्या प्रमाणावर होणारे स्थलांतर अशी अनेक संकटे या गावाने अनुभवली होती. मात्र सुमारे पंधरा वर्षांपूर्वी आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी पुढाकार घेत या गावात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणले. आदर्श गाव योजनेअंतर्गत पावसाचे पडणारे पाणी गावाच्या शिवारातच अडवण्याचा महत्त्वपूर्ण प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यात आला. या परिवर्तनाच्या वाटचालीत सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेची मोलाची साथ लाभली. या प्रकल्पांतर्गत गावाच्या हद्दीत दोन बंधारे बांधण्यात आले. त्यासोबतच सलग समतल चर, वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाची कामे प्रभावीपणे राबविण्यात आली. पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविण्यामुळे भूजल पातळीत लक्षणीय वाढ झाली आणि काही वर्षांतच भागडी हे गाव पाणीदार बनले. एकेकाळी रखरखीत असलेले शिवार हिरवेगार झाले असून मोठ्या प्रमाणात ओलिताखाली क्षेत्र आले आहे. या जलसंधारण व वृक्ष लागवडीच्या संयुक्त प्रयत्नांचा थेट परिणाम गावाच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. शेती उत्पादनात मोठी वाढ झाली असून एकरी उत्पादन वाढल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावला आहे. यासोबतच दुग्ध व्यवसायालाही मोठी चालना मिळाली असून दूध उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. परिणामी गावातील अनेक कुटुंबांना नियमित आणि हक्काचा रोजगार उपलब्ध झाला आहे. जवळपास २०० पेक्षा अधिक आजूबाजूच्या अन्य गावातील मजुरांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळू लागल्याने पुणे-मुंबईकडे होणारे स्थलांतर थांबले आहे.
एकेकाळी कौलारू घरे असलेल्या भागडी गावात आज टोलेजंग बंगले उभे राहिले आहेत. रोजगाराच्या शोधात शहरांकडे गेलेली अनेक कुटुंबे पुन्हा आपल्या मूळ गावी परत येऊन स्थिरावली आहेत. ही बाब केवळ विकासाचे नव्हे, तर गावकऱ्यांच्या आत्मविश्वासाचेही प्रतीक ठरत आहे. गावाच्या सर्वांगीण विकासामागे गावकऱ्यांची एकजूट, सामूहिक निर्णयप्रक्रिया आणि श्रमदानाची भावना महत्त्वाची ठरली आहे. गावकऱ्यांनी ‘हे आपलेच गाव आहे’ या भावनेतून एकदिलाने काम केले म्हणूनच हे परिवर्तन शक्य झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

