प्रसंगावधान राखल्याने वाचले वाहनचालकांचे प्राण

प्रसंगावधान राखल्याने वाचले वाहनचालकांचे प्राण

Published on

मंचर, ता. २५ : काळ आला होता, पण वेळ आली नव्हती या म्हणीचा प्रत्यय निरगुडसरचे (ता. आंबेगाव) उपसरपंच भाऊसाहेब फकीरा वळसे पाटील यांच्यासह अन्य तीन ते चार वाहनचालकांना शुक्रवारी (ता. २५) आला. रस्त्यात पतंगाच्या दोर अडकला होता. मात्र, प्रसंगावधान राखल्याने वाहनचालक थोडक्यात बचावले. ही घटना अवसरी फाटा ते पारगाव रस्त्यावरअवसरी खुर्द येथील कौली मळा परिसरात महानुभव आश्रमाजवळ घडली.

भाऊसाहेब वळसे पाटील हे दुपारी साडेअकराच्या सुमारास दुचाकीवरून अवसरीकडून मंचरकडे जात असताना अवसरी खुर्द हद्दीत रस्त्यालगत असलेल्या मोठ्या झाडावर पतंगाचा जाड दोरा अडकलेला होता. हा दोरा रस्त्यावर आडवा येऊनही वाहनचालकांच्या सहज लक्षात येत नव्हता. दरम्यान, येथे अचानक आलेल्या फोनमुळे वळसे पाटील यांनी वाहनाची गती कमी करून रस्त्याच्या कडेला दुचाकी घेतली. त्या वेळी त्यांच्या गळ्याला पतंगाच्या दोऱ्याचा फास बसला. मात्र, प्रसंगावधान राखत त्यांनी वाहन थांबविल्याने मोठा अनर्थ टळला. दोऱ्याचा फास लागला पण कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.
दरम्यान, त्यांच्या मागून येणाऱ्या सारस जारकड या तरुणाला रस्त्यातील दोरा न दिसल्याने दोरा लागून त्याचे दुचाकीवाहन घसरले. यात तो किरकोळ जखमी झाला. त्याच्या मागून येणाऱ्या दोन-तीन वाहनचालकांनी वेळीच वाहने थांबविल्याने पुढील अनर्थ टळला. उपस्थितांनी तात्काळ रस्त्यातील पतंगाचा दोरा बाजूला काढून जखमी तरुणास मदत केली. मोठ्या प्रमाणात असलेला दोरा जमा करून फेकून देण्यात आला. मात्र, दोरा काढताना एका वाहनचालकाच्या हाताला काप लागला.

पतंग उडविण्याचा हंगाम सुरू असल्याने कट झालेल्या अथवा सोडून दिलेल्या पतंगांचे दोरे व मांजा रस्त्यांवर तसेच झाडांवर अडकलेले दिसतात. अशा दोऱ्यांमुळे किरकोळ तसेच गंभीर अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना पतंग उडविताना सुरक्षिततेचे नियम समजावून सांगणे आवश्यक आहे.
- दिनेश खेडकर, माजी उपसरपंच अवसरी खुर्द (ता.आंबेगाव)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com