रिंगणात असून प्रचाराला वेग आला आहे.
डी.के.वळसे पाटील
मंचर, ता. २७ : आंबेगाव तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पक्षांतर, उमेदवारी नाट्य आणि आघाड्यांच्या समीकरणांमुळे लढती अधिकच रंगतदार झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या पाच गटांसाठी १७ उमेदवार, तर पंचायत समितीच्या दहा गणांसाठी तब्बल ३९ उमेदवार रिंगणात असून प्रचाराला वेग आला आहे.
तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) विरुद्ध शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व उद्धव ठाकरे शिवसेना अशी आघाडी तयार झाली आहे. भाजप व काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवली असून मंगळवारी (ता.२७) काही गटांमध्ये धक्कादायक व नाट्यमय घडामोडी घडल्या.
पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक गटात पक्षांतराचा धक्का:
पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक जिल्हा परिषद गटात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा पूजा निलेश वळसे(अपक्ष) यांनी माघार घेत थेट शिवसेनेत प्रवेश केल्याने पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. याचा फायदा शिवसेनेचे उमेदवार अरुण गिरे यांना होण्याची शक्यता आहे.
या गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार तथा माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील रिंगणात असून, दिलीप वळसे पाटील व पुणे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शैलजा ढोबळे यांचा पाठिंबा ही त्यांची जमेची बाजू मानली जात आहे.
विशेष म्हणजे विवेक वळसे पाटील व अरुण गिरे या दोघांनीही यापूर्वी पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद भूषविले आहे. भाजपचे किरण वाळूंज व अपक्ष गणेश काकडे यांमुळे ही लढत चौरंगी झाली आहे. सध्या वळसे पाटील व गिरे या दोन उमेदवारांमध्ये सोशल मिडीयाच्या माध्यमातून जोरदार आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.
कळंब–चांडोली बुद्रुक : पुनरावृत्ती की उलटफेर0
कळंब–चांडोली बुद्रुक गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुलसी भोर व राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रीती थोरात यांच्यात पुन्हा एकदा थेट लढत होत आहे. मागील निवडणुकीत भोर विजयी झाल्या होत्या. त्या निवडणुकीत थोरात यांचे धनुष्यबाण चिन्ह होते,यावेळी थोरात यांचे निवडणूक चिन्ह ‘तुतारी’ असल्याने मतदारांपर्यंत चिन्ह पोहोचवताना त्यांना कसरत करावी लागत आहे.
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांचा पाठिंबा थोरात यांना जमेचा, तर भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी आखलेली निवडणूक रणनीती भोर यांची ताकद मानली जात आहे.या गटात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.सध्याचे चित्र अटीतटीच्या लढतीचे आहे. येथे भाजपच्या रेखा पोकळेही रिंगणात आहेत.
पिंपळगाव अवसरी : पडद्यामागील हालचालींना वेग:
पिंपळगाव अवसरी गटात संतोष भोर, मनेश तळेकर व रामदास भोर यांनी माघार घेतली आहे. आता विष्णू हिंगे (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रशांत अभंग (शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस), प्रभाकर बांगर (स्वाभिमानी शेतकरी संघटना) आणि भाजपकडून रिंगणात उतरलेले दादाभाऊ थोरात यांच्यात चौरंगी लढत होत आहे. या गटात अजूनही पडद्यामागे हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे.
घोडेगाव–पेठ : भाजपच्या भूमिकेकडे लक्ष:
घोडेगाव–पेठ गटात निलेश काळे, सोमनाथ काळे, अशोक काळे व भाऊसाहेब बोऱ्हाडे यांनी माघार घेतली आहे. आता सुवर्णा दरेकर (शिवसेना), मंगल हुले (राष्ट्रवादी काँग्रेस) व प्रतिभा काळे (काँग्रेस) यांच्यात तिरंगी लढत होत आहे.
या गटात भाजपचा अधिकृत उमेदवार नसल्याने पक्ष कोणाला पाठिंबा देणार, यावर निवडणुकीचे गणित अवलंबून आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा प्रभाव हा मंगल हुले यांची जमेची बाजू, तर शिवसेनेचे माजी गटनेते देविदास दरेकर यांचा पाठिंबा सुवर्णा दरेकर यांना बळ देणारा ठरत आहे.
शिनोली गट : चौरंगी लढत, सरपंचांची भूमिका महत्त्वाची:
शिनोली गटात शीतल भारमळ (काँग्रेस), अनिता आढारी (भाजप), शिला लोहकरे (राष्ट्रवादी काँग्रेस) व सरिता साबळे (शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस) यांच्यात चौरंगी लढत आहे. येथेही पडद्यामागील हालचाली जोरात सुरू असून, काही सरपंचांची भूमिका निकालावर प्रभाव टाकणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
तालुक्यातील सर्वच गटांत प्रचाराला जोरदार सुरुवात झाली असून, पक्षांतर व आघाडीच्या गणितामुळे आंबेगावची निवडणूक यंदा अधिकच चुरशीची ठरणार असल्याचे स्पष्ट चित्र आहे.
चौकट :
• दादाभाऊ थोरात व प्रशांत अभंग पूर्वी दोघेही मित्र व शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते पण आता दोघेही एकमेकांच्या विरोधात.
• लोकसभा निवडणुकीपासून विवेक वळसे पाटील व अरुण गिरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते म्हणून कार्यरत होते पण सध्या ते एकमेकांच्या विरोधात नशीब अजमावत आहेत दुसर्यांदा त्यांच्यात लढत आहे.
• तुलसी भोर व प्रीती थोरात यांच्यात दुसर्यांदा लढत.
..................................................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

