मंचर नगरपंचायतीची उत्तुंग झेप

मंचर नगरपंचायतीची उत्तुंग झेप
Published on

मंचर, ता. १८ : मंचर (ता. आंबेगाव) नगरपंचायतीने पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात पुन्हा एकदा राज्यात मानाचा तुरा रोवला आहे. पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’मध्ये १५ ते २५ हजार लोकसंख्या गटात मंचर नगरपंचायतीने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावला असून, ३ कोटी रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे. सलग दुसऱ्या वर्षी राज्यात अव्वल स्थान मिळविण्याची ही उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे.
१ जून २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत राबविण्यात आलेल्या अभियानात पृथ्वी, अग्नी, जल, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांवर आधारित विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. मागील वर्षी ‘माझी वसुंधरा अभियान ४.०’मध्ये द्वितीय क्रमांक मिळवत ३ कोटी रुपयांचे पारितोषिक मिळविले आहे. नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतीने अवघ्या तीन वर्षांत ९८व्या स्थानावरून राज्यात अव्वल स्थानापर्यंतचा केलेला प्रवास थक्क करणार आहे.

नगरपंचायतीने राबविलेले उपक्रम
• दीड लाखांहून अधिक वृक्षलागवड
• अण्णासाहेब आवटे महाविद्यालय परिसरात मियावाकी पद्धतीने टप्पा १ व २अंतर्गत सुमारे १५ एकर क्षेत्रावर हरित पट्टा विकसित
• तीन बंधाऱ्यांचे पुनरुज्जीवन, घनकचरा व्यवस्थापन, जलसंवर्धन आणि व्यापक जनजागृती उपक्रम प्रभावीपणे राबविला.
• निघोटवाडी परिसरात बायोडायव्हर्सिटी पार्कमध्ये मियावाकी उद्यान साकारले.
• एक्सेंचर बहुराष्ट्रीय कंपनीने एक कोटी रुपये व मोरडे फूड्स प्रा. लि. कंपनीने सी.एस आर फंडातून विविध कामे केली.


‘माझी वसुंधरा अभियान ४.०’मध्ये द्वितीय क्रमांकासाठी २ कोटी रुपये व ‘उंच उडी’ विशेष कामगिरीसाठी १ कोटी रुपये, तसेच ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’मध्ये प्रथम क्रमांकासाठी ३ कोटी रुपये, अशी एकूण ६ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मंचर नगरपंचायतीला प्राप्त झाली आहे. या निधीतून शहरात पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा व हरित प्रकल्प मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती नगराध्यक्षा राजश्री गांजाळे व उपनगराध्यक्ष संदिप थोरात यांनी दिली.

मुख्याधिकाऱ्यांची उल्लेखनीय कामगिरी
मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्या नेतृत्वाखालील हा चौथा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. यापूर्वी कर्जत (जि. अहिल्यानगर) नगर पंचायत येथे कार्यरत असताना ‘माझी वसुंधरा’ अभियान १.० व २.० मध्ये अनुक्रमे द्वितीय व प्रथम क्रमांक मिळवत ४.५ कोटी रुपयांचे पारितोषिक मिळविण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. मंचरमध्ये अभियान ४.० व ५.० मध्ये अनुक्रमे द्वितीय व प्रथम क्रमांक मिळवत एकूण ६ कोटी रुपयांची भर पडली आहे. दोन्ही शहरांत मिळून अडीच लाख वृक्षलागवड व संवर्धन करण्यात आले असून, कर्जत येथे ५; तर मंचरमध्ये ३ मियावाकी उद्याने उभारण्यात आली आहेत.

MAC26B15260

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com