आंबेगाव, शिरूरमधील पिके बहरणार
मंचर, ता. २५ : हुतात्मा बाबू गेनू धरणातून उजव्या कालव्यात पाणी सोडल्याने आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हे पाणी बुधवारी दुपारी मंचर मार्गे हे पाणी अवसरी खुर्दसह पूर्व भागाकडे पुढे गेले. त्यामुळे सुमारे ५० हून अधिक गावांतील शेतीला पाणी उपलब्ध होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
रब्बी हंगामातील गहू, हरभरा, भाजीपाला व इतर तरकारी पिकांना याचा थेट लाभ होणार असून अनेक गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटण्यास मदत होणार आहे. वाढत्या उन्हामुळे लांडेवाडी, निघोटवाडी, मंचर, शेवाळवाडी, अवसरी खुर्द, गावडेवाडी, अवसरी बुद्रुक, मेंगडेवाडी, जारकरवाडी, पोंदेवाडी, वाळुजनगर, तसेच शिरूर तालुक्यातील कवठे व सविंदने आदी गावांत शेती व पिण्याच्या पाण्याची टंचाई गंभीर होत चालली होती.
या पार्श्वभूमीवर मेंगडेवाडीचे सरपंच बाळासाहेब मेंगडे, अवसरी खुर्दचे सरपंच प्रसाद कराळे, रामभाऊ ढोबळे यांच्यासह शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन उजव्या कालव्यात तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानंतर वळसे पाटील यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतल्याने कालव्यात पाणी सोडण्यात आल्याची माहिती बाळासाहेब मेंगडे यांनी दिली.
दरम्यान, कुकडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता गणेश नानोर यांनी शेतकऱ्यांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. पिकांना आवश्यक तेवढेच पाणी द्यावे, पाणी दिल्यानंतर विद्युत मोटारी तात्काळ बंद कराव्यात व पाणी वाया जाणार नाही याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले. सध्या कालव्यात ८० क्यूसेक पाणी सोडले असून, टप्प्याटप्प्याने सदर पाणी २०० क्युसेकपर्यंत वाढविण्यात येणार आहे.
15306
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

