मंचर पोलिस ठाणे हद्दीतील 
शेवाळेवर स्थानबद्धतेची कारवाई

मंचर पोलिस ठाणे हद्दीतील शेवाळेवर स्थानबद्धतेची कारवाई

Published on

मंचर, ता. २६ : पुणे ग्रामीण पोलिसांनी आंबेगाव तालुक्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अमीर उर्फ अमर बाळासाहेब शेवाळे (वय २८, रा. शेवाळेमळा-लांडेवाडी, ता. आंबेगाव) याच्यावर कारवाई करीत त्याला एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्ध केले.
पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी मागील पाच वर्षांतील गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या व जामिनावर सुटून पुन्हा गुन्हे करणाऱ्या सराईत आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीतील धोकादायक गुन्हेगारांची माहिती अद्ययावत करून त्यांच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई प्रस्तावित करण्यात आली. मंचर पोलिस ठाणे हद्दीतील अमीर उर्फ अमर बाळासाहेब शेवाळे या सराईत गुन्हेगारावर अवैध शस्त्र बाळगणे, संगनमताने नदीपात्रातून वाळू चोरी करणे, पर्यावरणाची हानी करणे, जीवे मारण्याचा प्रयत्न, शासकीय व खासगी मालमत्तेची तोडफोड अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तसेच, भारतीय दंड विधान कलम ३०७ सह विविध गंभीर गुन्हे आणि भारतीय हत्यार कायदा १९५९ अंतर्गत गुन्हे नोंदवले गेले होते.
वारंवार गुन्हेगारी कृत्यांमुळे तो सार्वजनिक शांतता व कायदा, सुव्यवस्थेस धोका निर्माण करत असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी त्याच्याविरुद्ध एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाईचा प्रस्ताव पोलिस अधीक्षकांकडे सादर केला होता. महाराष्ट्र झोपडपट्टी, हातभट्टी, औषधद्रव्य गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, व्हिडिओ पायरट, वाळू तस्कर व काळाबाजार करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध लागू असलेल्या कायद्यानुसार शेवाळे याला स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले गेले. त्यानुसार, त्याला ताब्यात घेऊन नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक कंकाळ यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com