जादा फेऱ्यांअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय
मंचर, ता. १ : आंबेगाव तालुक्यातील अनेक मार्गांवरील एसटी बस वेळेवर न येणे, वारंवार फेऱ्या रद्द होणे यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. तसेच शैक्षणिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर आंबेगाव तालुका विद्यार्थी संघाच्या वतीने शुक्रवारी (ता. २७) मंचर एसटी बस स्थानकावर अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. तातडीने जादा बसफेऱ्या सुरू न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.
निवेदन देताना १०० हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. तालुक्यातील शंभरहून अधिक गावांमधील विद्यार्थी दररोज मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालय, महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, अवसरी खुर्द येथील शासकीय अभियांत्रिकी व शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात शिक्षणासाठी ये-जा करतात. मात्र बसची अपुरी संख्या व अनियमित फेऱ्यांमुळे विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या वेळी मंचर तांबडे मळा आगाराचे साहाय्यक वाहतूक अधिकारी पांडुरंग मुठे, साहाय्यक वाहतूक निरीक्षक जनार्दन शेंगाळे व वाहतूक नियंत्रक छगन शेवाळे यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. सकाळी ७.३० ते १२.०० व सायंकाळी ४.०० ते ६.०० या गर्दीच्या वेळेत जादा बसफेऱ्या सुरू कराव्यात, सर्व फेऱ्यांसाठी नियमित वेळापत्रक लागू करावे, ग्रामीण भागातून शाळा-महाविद्यालयांकडे थेट बससेवा वाढवावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
महात्मा गांधी विद्यालय, मंचर समोरील बसथांब्यावर बसेस नियमित थांबत नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली असून, त्या ठिकाणी थांबा सुनिश्चित करण्याची मागणी करण्यात आली. तसेच साकोरे, पिंपळगाव खडकी, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, पारगाव आदी गावांमधून थेट बससेवा सुरू करावी, बस पास प्रक्रिया सुलभ करावी, महिला विद्यार्थिनींसाठी सुरक्षित प्रवासाची व्यवस्था करावी आणि चालक-वाहकांनी विद्यार्थ्यांशी योग्य वर्तन करावे, अशा विविध मागण्यांचा समावेश निवेदनात आहे.
15317
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

