सभापती, उपसभापतिपदी कोणाची वर्णी?
मंचर, ता. ५ : आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतिपदी कोणाची वर्णी लागणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
सभापती, उपसभापती पदासाठी सोमवारी (ता. ९) सकाळी ११ वाजता घोडेगाव येथील पंचायत समितीच्या मुख्यालयात निवडणूक होणार आहे. पीठासन अधिकारी तथा आंबेगाव-जुन्नर विभागाचे प्रांत गोविंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, सचिव तथा गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडणार आहे. पंचायत समितीच्या नवनिर्वाचित दहा सदस्यांना नोटिसा बजावून निमंत्रित करण्यात आले आहे. अलीकडेच पार पडलेली पंचायत समिती सदस्यांची निवडणूक चुरशीची ठरली होती. येथे महाविकास आघाडी व शिवसेना (शिंदे) यांनी एकत्रित लढत देत राष्ट्रवादी काँग्रेस व काही ठिकाणी भाजपसमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मतदारांनी राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील व माजी खासदार तथा म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट कौल दिला. राष्ट्रवादी काँग्रेसला आठ जागा, तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दोन जागा मिळाल्या आहेत. नुकतेच वळसे पाटील तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता काही शिष्टमंडळांनी त्यांची भेट घेतली; मात्र त्यांनी कोणालाही स्पष्ट शब्द दिला नसल्याने सभापती व उपसभापतिपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सभापतिपदाचा पूर्वानुभव असलेले संजय गवारी, कैलास बुवा काळे, उषा कानडे तसेच प्रथमच निवडून आलेले नीलेश टेमकर, शिवाजीराव निघोट, संजय पवळे, ज्योती पारधी, अंकिता वाळुंज हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य आहेत. तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्वेता ढोबळे व प्रियांका वाघ हे सदस्य आहेत.
वळसे पाटील जो निर्णय घेतील, तो मान्य
इच्छुक उमेदवार व समर्थकांकडून “वळसे पाटील जो निर्णय घेतील, तो मान्य” अशी भूमिका व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, इतर काही तालुक्यांप्रमाणे सदस्यांना अज्ञात स्थळी हलविण्यात आले नसल्याने आंबेगाव तालुक्यातील राजकीय वातावरण सध्या शांत व स्थिर आहे. सोमवारी होणाऱ्या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून, निकालानंतर पुढील राजकीय समीकरणे स्पष्ट होणार आहेत. अंतिम निर्णय दिलीप वळसे पाटील घेणार असून वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेनंतरच सभापती, उपसभापतिपदाची नावे जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दृष्टीक्षेपात
अनुभवी सदस्याला की नव्या चेहऱ्याला संधी?
भौगोलिक संतुलन साधत पश्चिम-पूर्व भागाचा विचार होणार का?
पक्षनिष्ठा व सातत्याने काम करणाऱ्या सदस्याला प्राधान्य?
शैक्षणिक गुणवत्ता व जनसंपर्क क्षमता निर्णायक ठरणार?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

