मंचर, अवसरीमध्ये विजेचा खेळखंडोबा

मंचर, अवसरीमध्ये विजेचा खेळखंडोबा
Published on

मंचर, ता. २६ : मंचर शहरासह अवसरी खुर्द, भोरवाडी, तांबडेमळा व शेवाळवाडी परिसरात गेल्या आठ दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. यामुळे नागरिक, व्यावसायिक, शेतकरी हैराण झाले आहेत. विशेषतः आरोग्यसेवेवर याचा परिणाम होत असून, रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मंचर शहरात उपजिल्हा रुग्णालयासह सुमारे ३० लहान-मोठी खासगी रुग्णालये आहेत. अनेक रुग्णालयांत नवजात बालकांची सुविधा, डोळ्यांसह विविध शस्त्रक्रिया केल्या जातात. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर काही ठिकाणी स्वयंचलित जनरेटर व्यवस्था नसल्याने जनरेटर सुरू करण्यास वेळ लागतो. त्यामुळे शस्त्रक्रिया, उपचार व रुग्णांवर परिणाम होण्याची शक्यता आहे, अशी भीती आधार क्लिनिकचे डॉ. सुदाम खिलारी यांनी व्यक्त केली. काही ठिकाणी वीज गेल्याने लिफ्टमध्ये रुग्ण अडकल्याची माहितीही समोर आली आहे.

व्यावसायिक, औद्योगिक आस्थापना, सहकारी संस्था, शासकीय व निमशासकीय कार्यालये, घरगुती ग्राहक तसेच कृषी पंप ग्राहकांची संख्या २६ हजारांहून अधिक आहे. दर गुरुवारी दुरुस्तीच्या कामासाठी सात ते आठ तास वीजपुरवठा बंद ठेवला जातो. तांत्रिक अडचणींचे कायमस्वरूपी निराकरण करून अखंड वीजपुरवठा करावा, अशी मागणी अवसरी खुर्द ग्रामपंचायतीचे प्रशासक प्रसाद कराळे यांनी केली.

वारंवार खंडित होणाऱ्या विजेमुळे पिकांना वेळेवर पाणी देता येत नसल्याने शेतीचे नियोजन कोलमडत असल्याचे शेतकरी सतीश वायाळ यांनी सांगितले.

वादळ किंवा पाऊस नसतानाही बुधवारी (ता. २६) मंचर शहर परिसरात चार ते पाच वेळा वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे नागरिकांत तीव्र नाराजी आहे. ‘महावितरण’ने अखंड वीजपुरवठ्यासाठी नियोजन करावे.
- लक्ष्मण थोरात, उपनगराध्यक्ष, मंचर नगरपंचायत

मंचर-मणिपूर येथील वीज उपकेंद्रातील केबल बर्स्ट झाल्यामुळे वीजपुरवठ्यात व्यत्यय निर्माण झाला होता. खराब केबलची दुरुस्ती करून नवीन केबल जोडण्यात आल्या आहेत. परिसरातील वीजपुरवठा सुरळीत व अखंड ठेवण्यासाठी आवश्यक नियोजन सुरू आहे.
- डी. एम. शेख, सहाय्यक अभियंता, महावितरण कंपनी, मंचर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com