नीरा नदीकाठच्या गावांमध्ये दुर्गंधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नीरा नदीकाठच्या गावांमध्ये दुर्गंधी
नीरा नदीकाठच्या गावांमध्ये दुर्गंधी

नीरा नदीकाठच्या गावांमध्ये दुर्गंधी

sakal_logo
By

माळेगाव, ता. २३ : नीरा नदीमधील दूषित पाण्याची दुर्गंधी बारामती तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये पसरली आहे. या समस्येविरुद्ध खांडज, सांगवी, शिरवली, कांबळेश्वर, मेखळी, नीरावागज आदी गावातील शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
खांडज गावातील युवकांनी थेट ट्विटर व इतर प्रसार माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार आदींचे लक्ष या प्रश्‍नाकडे वेधले आहे. तसेच, प्रदूषण करणाऱ्या कारखानदाराविरुद्ध चौकशी करून कारवाई करण्याची मागणीही संबंधित गावकऱ्यांनी केली. या प्रकरणाची तीव्रता विचारात घेऊन पोलिस यंत्रणेनेही शासनस्तरावर गोपनीय अहवाल वरिष्ठांना पाठविला आहे.
याआगोदर केंद्रीय अन्नप्रक्रिया व जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटले यांनीही बारामती दौऱ्यामध्ये वरील नीरा नदीमधील प्रदूषणाचा प्रश्न हाताळला होता. बारामतीमधील नदीकाठच्या जमिनी क्षारपड होत असून, त्या जमिनींचे आरोग्य सुधारण्यासाठी केंद्रातील शास्त्रज्ञांची टिम सर्वे करण्यासाठी पाठविली जाईल, असे त्यावेळी त्यांनी सांगितले होते.
तसेच, १७ सष्टेंबर २०२२ रोजी माळेगाव साखर कारखान्याच्या सदिच्छा भेटीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनीही नदीमधील प्रदूषणाचा मुद्दा गंभीर असल्याचे सांगितले होते. हा प्रश्न तडीस नेण्यासाठी मी लक्ष घालेन, असे त्यांनीही संचालकांसह शेतकऱ्यांना आश्वासित केले होते. या समस्येवर कायमचा तोडगा काढण्यासाठी बारामतीसह फलटणचे नेते रामराजे नाईक निंबाळकर व तेथील कारखांदारांची बैठक लवकरच घेतली जाईल.

दुहेरी संकटामुळे शेतकरी मेटाकुटीला
शेतकरी रणजित धुमाळ, नितीन आटोळे, किरण तावरे म्हणाले, ‘‘नीरा नदीचे दूषित पाणी शेतीला देऊ शकत नाही, तर नीरा डावा कालव्याचे हक्काचे पाणी शेतीला मिळण्याचा कालावधी तब्बल ६० ते ७० दिवसांवर पोचला आहे. हा दुहेरी अन्याय नदीकाठच्या शेतकऱ्यांसह गावकऱ्यांनी किती दिवस सोसायचा. पूर्वी दूषित पाणी निर्माण करणाऱ्या कारखानदाराविरुद्ध शेकडो शेतकऱ्यांनी रस्ता रोकोसारखी आंदोलने छेडली होती. त्यावेळी संबंधित कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते. वास्तविक आंदोलनकर्त्यांवर गुन्हा आणि बेकायदा नदीमध्ये दूषित पाणी सोडणाऱ्या कारखानदारांना सन्मानाची वागणूक, असा उलटा न्याय आजवर पोलिस, महसूल प्रशासनांसह नेतेमंडळींनी झाला आहे.’’

जमिनींसह जनावरांच्या आरोग्यावर परिणाम
फलटण-बारामती भागातील नदी काठच्या कारखानदारांचे दूषित पाणी (रसायनमिश्रित) वर्षानुवर्षे नदीत सोडले जाते. परिणामी जमिनींबरोबर जनावरे, माशांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. शेकडो एकर जमीन नापिक झाली, तर उर्वरित जमिनीलाही त्याच मार्गावर असून, त्यामधील एकरी उत्पादनामध्ये लक्षणीय घट होत चालली आहे. दीडशेपेक्षा अधिक आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल होऊनही प्रदूषणाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही, अशी भूमिका संजय देवकाते, बाळासाहेब वाबळे, बाबूराव चव्हाण यांनी मांडली.