बारामतीत लिंगनिदान प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई

बारामतीत लिंगनिदान प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई

माळेगाव, ता. ८ : बारामती उपजिल्हा रुग्णालयातील प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. महेश सोपानराव जगताप यांनी प्रसूतिपूर्व लिंगनिदान प्रतिबंधक कायद्यांतर्गत माळेगाव-गोफणेवस्ती नजीक एका डॉक्टरसह एजंटाविरुद्ध कारवाई केली. पोलिसांच्या मदतीने झालेल्या या कारवाईमध्ये एका महिलेची गर्भनिदान चाचणी केल्याचे उघड झाले. त्यासाठी वापरलेल्या सोनोग्राफी मशिनसह इतर यंत्रसामग्री मिळून आली.
या कारवाईमध्ये डॉ. मधुकर चंद्रकांत शिंदे (वय ५२, रा. लक्ष्मीनगर प्लॅट नं. २९, ता. फलटण जि. सातारा), एजंट नितीन बाळासाहेब घुले (वय ३४ वर्षे, रा. ढेकळवाडी ता. बारामती) यांच्या पोलिसांनी मुस्क्या आवळल्या आहेत. या कारवाईची माहिती तालुक्यात वाऱ्यासारखी पसरल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली. दरम्यान, शुक्रवारी (ता. ७) रात्रीच्यावेळी बारामती उपजिल्हा रुग्णालयाकडून ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. महेश जगताप यांनी संशयित आरोपी डॉ. मधुकर शिंदे, एजंट नितीन घुले यांच्याविरुद्ध माळेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे सहाय्यक पोलिस निरिक्षक बालाजी भांगे यांनी डॉ. शिंदे आणि घुले यांच्या विरुद्ध प्रसूतिपूर्व लिंगनिदान प्रतिबंधक कायद्यांतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. सदर प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे. त्यादृष्टीने पुढील पोलिस तपास होईल, अशी माहिती पोलिस अधिकारी भांगे यांनी दिली.

लिंगनिदान प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाईचे स्वरूप फार कडक आहे. या कायद्याचे उल्लंघन केल्यास संबंधित डॉक्टरविरुद्ध, तसेच त्यासंबंधी सेवा घेणाऱ्या कुटुंबियांवरही दाखल गुन्ह्यांतर्गत कारवाई होऊ शकते. याशिवाय गर्भनिदान चाचणीसाठी महिलेवर सक्ती केल्याचे गृहित धरून पती आणि इतर नातेवाईकांचीही चौकशी होऊ शकते.
डॉ. महेश जगताप, प्रभारी वैद्यकीय अधिक्षक, उपजिल्हा रुग्णालय, बारामती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com