विरोधकांनी सांगितलेला इथेनॉल प्रकल्प तोट्याचा

विरोधकांनी सांगितलेला इथेनॉल प्रकल्प तोट्याचा

Published on

माळेगाव, ता. २ : व्हेपर (वाफ) रुट पद्धतीचा ५ लाख लिटर क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प उभारणीला १९५ कोटी नव्हे, तर इन्सिरनेशन बॉयलरसह २५० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च होणार आहे. या बॉयलरला ७० टक्के पेंटव्हॉश जाळावा लागतो. शहरीकरण भागात प्रदूषण नियंत्रण मंडळाचीही मुद्दा आहे. त्यामुळे विरोधकांच्या अग्रहास्तव व्हेपर रुट पद्धतीचा इथेनॉल प्रकल्प माळेगाव कारखान्याच्या दृष्टीने तोट्याचा व आरोग्याच्या दृष्टीने धोक्याचा आहे. त्यामुळे प्रशासनाने ठरविलेला २ लाख ४० हजार लिटर क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प होणे सर्वार्थाने फायद्याचा ठरणार आहे, अशी माहिती माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप यांनी दिली. विरोधी मंडळी, व्हीएसआय संस्थेचे प्रतिनिधी, जाणकार सभासद व संचालक मंडळ एकत्र बसून वरील प्रकल्पाबाबत फायद्या- तोट्याचे समीकरण सोडविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

माळेगाव सहकारी साखर कारखाना प्रशासनाने दीडशे कोटी खर्च करून सुमारे २ लाख ४० हजार लिटर क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प विस्तारित करण्याचा महत्वकांक्षी निर्णय घेतला आहे. त्या धोरणात्मक निर्णयाला विरोधी ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे, माजी अध्यक्ष रंजन तावरे, अॅड. जी. बी. गावडे यांनी तीव्र आक्षेप घेत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमिवर प्रशासनाची बाजू पत्रकारांशी मांडताना अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप यांनी स्पष्ट केली. यावेळी सत्ताधारी ज्येष्ठ संचालक बाळासाहेब तावरे, कार्यकारी संचालक अशोकराव पाटील, संचालक अनिल तावरे, योगेश जगताप, डिस्टलरी मॅनेजर नंदकुमार जगदाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

साखरेचे दर सध्या क्विंटलला ३७०० पर्यंत पोचल्याने इथेनॉलपेक्षा साखर तयार करणे परवडते, नॅशनल फेडरेशनच्या मागणीनुसार ४०५०च्या पुढे जाणारी साखरेची किंमत (एमएसपी), परिणामी साखर निर्मिती आणि इथेनॉल निर्मितीचा बॅलन्स साधणे महत्त्वाचे आहे, पारंपरिक पद्धतीच्या (कन्वेशन मेथड) इथेनॉल प्रकल्पांना माळेगाव कारखान्यासह राज्यात अनेक कारखान्यांची पसंती, इस्लामपूर येथील व्हेपर (वाफ) रुट पद्धतीने बंद पडलेले इथेनॉल प्रकल्प, सिरफ टू इथेनॉल तयार करण्याला केंद्राचे निर्बंध असल्याने व्हीएसआय संस्थेची प्रकल्प अहवाल तयार करण्यास मनाई आदी मुद्यांच्या आधारे अध्यक्ष अॅड. जगताप व सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी विरोधकांची मागणीला फेरविचार करण्यास भाग पाडले.

विरोधकांचा आग्रह कशासाठी?
केशवराव जगताप म्हणाले, ‘‘व्हेपर रुट पद्धतीचा इथेनॉल प्रकल्प बनवणारी एकमेव प्राजा कंपनी आहे. या व्यवसायात स्पर्धा होऊ नये, या उद्देशाने प्राजा कंपनीची मार्केटिंग पॉलिसी असू शकते. कंपनीच्या या भूमिकेला आपलीच काही मंडळी बळी पडली आहेत. राजारामबापू पाटील साखर कारखाना इस्लामपूर येथे व्हेपर रुट पद्धतीचा इथेनॉल प्रकल्प उभारणी चालू होती, परंतु माजी मंत्री जयंत पाटील यांना या प्रकल्पाचे संभाव्य धोके लक्षात आल्याने त्यांनी हा प्रकल्प थांबविला. आजही तेथे ‘जैसे थे’ परिस्थिती आहे. त्यानंतर राज्यात कोणत्याच कारखान्यांनीही असे धाडस केले नाही. अशी प्राप्त प्रतिकूल स्थिती असताना माळेगाव कारखान्याच्या विरोधकांचा आग्रह कशासाठी आहे, हे समजत नाही.’’

विस्तारीकरणाचा अनुभव विचारात घ्या
माळेगाव साखर कारखान्याचे विस्तारीकरण व आधुनिकीकरण करण्यासाठी ७० कोटी खर्च येईल, असे विरोधीमंडळी तीन वर्षांपूर्वी सत्तेत असताना सांगायचे, परंतु हा विस्तारीकरणाचा प्रकल्प त्यावेळी दीडशे कोटींवर पोचला. त्यानंतरही राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आल्यावर बाळासाहेब तावरे यांच्या संचालक मंडळाला आणखी आवश्यकतेनुसार ४५ कोटी खर्च करावा लागला. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे विरोधी मंडळीच्या म्हणण्यानुसार ५ लाख लिटर क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प उभारणीसाठी १९५ कोटी नव्हे, तर २५० कोटी रुपये खर्च होणार आहेत. ही बाब कारखान्याच्या अर्थकारणाला अव्यवहारी आहे, अशी माहिती संचालक अनिल तावरे, योगेश जगताप यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.