बारामतीत पत्रकाराचा मृत्यू, नात जखमी
माळेगाव, ता. ३० : शारदानगर (ता. बारामती) येथे राज्यमार्गावर झालेल्या भीषण अपघातात फलटण (जि. सातारा) तालुक्यातील एका ज्येष्ठ पत्रकाराचा मृत्य झाला, तर त्यांची १३ वर्षाची नात गंभीर जखमी झाली. शनिवार (ता. ३०) सकाळी साडेसात वाजल्याच्या सुमारास हा अपघात झाला. राजेंद्र दिनकर भागवत (वय ५९, रा. गोखळी, ता. फलटण) हे मृत्युमुखी पडलेल्या पत्रकाराचे नाव आहे. तर त्यांची नात स्वरा योगेश भागवत ही जखमी झाली आहे. येथील राज्यमार्गावर सातत्याने अपघात झाले आहेत. प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना न केल्याने गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत ठिय्या केला.
बारामती- नीरा राज्यमार्ग शारदानगर हद्दीतून जातो. येथे अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट हे शैक्षणिक संकुल कार्यरत आहे. येथे मैदानी खेळाच्या सरावासाठी राजेंद्र भागवत हे आपल्या नातीला (स्वरा) सोडण्यासाठी शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास मोटारसायकलद्वारे येत होते. पाहुणेवाडीमार्गे शारदानगर येथील २४ फाट्यावरील पुलावर आले तेव्हा माळेगावच्या दिशेने वेगाने निघालेल्या एसटी बसला ते समोरासमोर धडकले. या अपघातात भागवत हे जागीच मृत्युमुखी पडले, तर स्वरा ही गंभीर जखमी झाली. बारामती शहरातील खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.
ही दुर्घटना सकाळीच वेळी घडल्याने येथील गावकऱ्यांची व प्रवाशांची घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. या घटनास्थळी याआगोदर अनेकदा लहानमोठे अपघात घडल्याने येथील गावकऱ्यांनी प्रशासनाच्याविरूद्ध रोष व्यक्त केला. संतप्त जमावाने रस्त्यावर ठिय्या मांडला. माळेगावचे कार्यकर्ते बाळासाहेब सस्ते, संदीप आढाव, काळूराम चौधर, प्रशांत मांढरे, स्वप्नील वाघमोडे, मयूर खोमणे, दादा चौंडकर, प्रतिक खटाटे, वैभव सस्ते, अमित साळुंके, अमन मुलानी, करणजित पवार, रामचंद्र देवकाते, धिरज सस्ते, माउली सस्ते आदींनी प्रशासनाविरुद्ध आवाज उठविला.
दरम्यान, बारामती- नीरा राज्यमार्गावरील वाहतूक दोन तास खोळंबली. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न चिघळू नये, या उद्देशाने तातडीने तहसीलदार गणेश शिंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन लोखंडे, बांधकाम खात्याचे अधिकारी जाधव यांनी जमावाला सामोरे गेले. अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करतो, असे आश्वासन त्यांनी दिले. महसूल, पोलिस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर हा राज्यमार्ग दोन तासांनी वाहतुकीसाठी खुला केला.
दरम्यान, बारामती शहरातील खंडोबानगर येथे जड वाहनाखाली तिघांचा अपघाती मृत्यू झाल्याची ताजी घटना असतानाच, आता शारदानगर येथे भीषण अपघात झाला. परिणामी स्थानिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. या समस्येवर प्रतिबंधात्मक उपाययोजना होण्यासाठी अनेक पालक, स्थानिक रहिवाशांसह प्रवाशांनी पाठपुरावा केला होता, परंतु अद्याप प्रशासनाने दखल घेतली नाही, असे असा आरोप वैभव सस्ते, के. के. खोमणे आदींनी केला. दरम्यान, अपघात घटनास्थळी प्रशासनाने तातडीने दखल घेऊन गतिरोधक तयार केला.
संयुक्त बैठक होणार : तहसीलदार
तहसीलदार गणेश शिंदे म्हणाले, ‘‘शारदानगर येथील शैक्षणिक संकुलाचा विचार करून बारामती- नीरा राज्यमार्गाचे चौपदरीकरण झाले आहे. याशिवाय येथील सेवा रस्त्याचेही काम प्रगतिपथावर आहे. परंतु, अपघात टाळण्यासाठी गतिरोधक, रिफ्लेक्टर, पथदिवे, दिशादर्शक फलक आदी उपाययोजना करणे बाकी आहे. या पार्श्वभूमिवर शारदानगर येथे शिक्षण संस्थेसह स्थानिक प्रतिनिधी व प्रशासनाची संयुक्त बैठक प्रांताधिकाऱ्यांच्या आधिपत्याखाली पुढील दोन दिवसात घेतली जाईल. तोपर्यंत घटनास्थळी तातडीच्या उपयोजनेचे काम सुरू करीत आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.