ॲग्रोहोमिओपॅथी शेती शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण

ॲग्रोहोमिओपॅथी शेती शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण

Published on

माळेगाव, ता. १५ः ॲग्रोहोमिओपॅथी शेती शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीचा आणि समाज आरोग्याचा नवा शाश्वत मार्ग दिसून येत आहे. त्यामुळे ही शेती शेतकऱ्यांसाठी आशेचा नवा किरण ठरत आहे. त्यामुळेच बारामती कृषी विज्ञान केंद्रातील संशोधनाधारित ॲग्रोहोमिओपॅथी शेतीची पद्धत यंदाच्या ‘कृषिक २०२६’ मध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीने विशेष आकर्षण ठरणार आहे.
रासायनिक शेतीमुळे वाढणारा उत्पादन खर्च, जमिनीचा ऱ्हास आणि मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी उपयुक्त होणार आहे. या पार्श्वभूमीवर ॲग्रोहोमिओपॅथी शेती संशोधनाधारित, पर्यावरणपूरक आणि किफायतशीर शेती पद्धत शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे ही शेती आशेचा नवा किरण ठरत आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्रात (केव्हीके) या नावीन्यपूर्ण शेती पद्धतीवर सखोल संशोधन व प्रात्यक्षिके सुरू आहे. या शेतीचे आकर्षण ‘कृषिक २०२६’ या भव्य कृषी प्रदर्शनात पाहण्याची संधी शेतकरी, अभ्यासक आणि नागरिकांना मिळणार आहे. ॲग्रोहोमिओपॅथी ही संकल्पना होमिओपॅथीच्या तत्त्वांवर आधारित असून, पिकांच्या वाढीसाठी, रोग-कीड नियंत्रणासाठी आणि जमिनीच्या सुपीकतेसाठी अतिशय अल्प मात्रेत नैसर्गिक व सुरक्षित उपायांचा वापर करते. रासायनिक कीटकनाशके व खतांवर अवलंबित्व कमी करत ही पद्धत उत्पादनखर्च घटवते, तसेच पिकांचे आरोग्य व उत्पादनक्षमता वाढवते, हे बारामती कृषी विज्ञान केंद्रातील संशोधनातून स्पष्ट होत आहे.

ॲग्रोहोमिओपॅथीचे सकारात्मक परिणाम
केव्हीकेमध्ये राबविण्यात येणाऱ्या प्रायोगिक शेतांमध्ये भाजीपाला, कडधान्ये, फळपिके तसेच तृणधान्यांवर ॲग्रोहोमिओपॅथीचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. रोगप्रतिकारक शक्ती वाढणे, किडींचा प्रादुर्भाव कमी होणे आणि उत्पादनाची गुणवत्ता सुधारणे, हे या पद्धतीचे ठळक फायदे असल्याचे केव्हीकचे डॉ. मिलिंद जोशी यांनी सांगितले.

भविष्यातील शाश्वत कृषी विकासासाठी महत्त्वाचे
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवतानाच समाजाचे आरोग्य जपणे, हा ॲग्रोहोमिओपॅथीचा मूळ उद्देश आहे. कमी खर्चात अधिक नफा, जमिनीचे दीर्घकालीन संवर्धन आणि विषमुक्त अन्ननिर्मिती यामुळे ही शेती पद्धत भविष्यातील शाश्वत कृषी विकासासाठी महत्त्वाची ठरणार आहे, असे मत कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ.वैभव जैन, विश्वजित वाबळे यांनी व्यक्त केले.

प्रदर्शनात स्वतंत्र दालन
‘कृषिक २०२६ ’ या प्रदर्शनात ॲग्रोहोमिओपॅथीवर आधारित स्वतंत्र दालन उभारण्यात येणार आहे. प्रत्यक्ष प्रात्यक्षिके, मार्गदर्शन सत्रे आणि यशस्वी प्रयोगांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. आधुनिकतेची सांगड घालत पारंपरिक शेतीला नवे परिमाण देणारी ही पद्धत पाहण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. शाश्वत शेती, निरोगी समाज आणि समृद्ध शेतकरी या त्रिसूत्रीचा संदेश देणारी ॲग्रोहोमिओपॅथी शेती बारामतीत केली जात आहे, याचा आम्हाला सर्वस्वी आनंद आहे, असे मत अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे यांनी व्यक्त केले.
03036

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com