बारामतीतील यात्रा-उत्सव रद्द; वृक्षारोपणाचा संकल्प

बारामतीतील यात्रा-उत्सव रद्द; वृक्षारोपणाचा संकल्प

Published on

माळेगाव, ता.२५ : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक, नीरावागज, सांगवी आदी गावांतील ग्रामस्थांनी आपल्या भावना विधायक कृतीतून व्यक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात संबंधित गावांमध्ये होणाऱ्या विविध दैवतांच्या यात्रा व उत्सव होणार नाहीत, अशा घोषणाही यात्रा उत्सव समिती व ग्रामस्थांच्या बैठकीत करण्यात आल्या आहेत.
बारामतीत पारंपरिक साज-शृंगार, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मोठ्या प्रमाणावर होणारे सोहळे यापुढे टाळले जाणार आहेत. ‘‘दादांनी आम्हाला विकासाचा मार्ग दाखविला, त्यांच्या स्मृतीला खरा मान देण्यासाठी आपणही समाजहिताचा मार्ग स्वीकारूया,’’ अशी भावना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते आदी ग्रामस्थांनी व्यक्त केली. याच पार्श्वभूमीवर माळेगावच्या भैरवनाथ यात्रा उत्सव कमिटीने बुधवारी (ता. २५) शारदानगर ते माळेगाव या रस्त्याच्या दुभाजकामध्ये आकर्षक व नियोजनबद्ध फुलांचे वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला आहे. केवळ वृक्षारोपणच नव्हे, तर त्या वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारीही ग्रामस्थांनी स्वेच्छेने स्वीकारली आहे.
दरम्यान, मंगळवार (ता.२४) बारामती येथे झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष संदीप बांदल व विश्वासराव देवकाते आदी तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यात्रा उत्सव साजरे न करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर तालुक्यातील अनेक गावांमध्ये शोकभावनेतून विधायक उपक्रम राबवण्याची चळवळ सुरू झाली आहे. विविध ठिकाणी वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, रक्तदान शिबिरे यांसारखे उपक्रम आयोजित करण्याचा निर्धार करण्यात येत आहे. अजित पवार यांनी बारामतीच्या विकासासाठी आयुष्य वेचले. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या प्रगतीची साक्ष देणारी अनेक कामे आजही जनतेच्या मनात कोरलेली आहेत. अशा लोकनेत्याच्या स्मृतीला अभिवादन करताना गावकऱ्यांनी उत्सवांवरील खर्च टाळून पर्यावरण संवर्धनाचा मार्ग स्वीकारला आहे, अशी माहिती संदीप बांदल यांनी सांगितली.

विधायक प्रयत्न समाजासाठी प्रेरणादायी
अजित पवार यांच्या शोकातून सावरण्याचा आणि विकासाचा दीप तेवत ठेवण्याचा बारामतीकरांचा हा विधायक प्रयत्न समाजासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. अजित पवारांच्या विचारांची हिरवीगार साक्ष म्हणून लावली जाणारी ही झाडे भविष्यातील पिढ्यांना त्यांच्या कार्याची आठवण करून देतील, अशी भावना यावेळी माळेगावच्या भैरवनाथ यात्रा उत्सव समितीने व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com