‘अंधारबन’मध्ये अटींसह प्रवेश

‘अंधारबन’मध्ये अटींसह प्रवेश

Published on

माले, ता. ७ : मुळशी तालुक्‍यातील पिंपरी (ता. मुळशी) अंधारबन, कुंडलिका व्‍हॅली ही दोनही पर्यटन स्‍थळे पर्यटकांसाठी शनिवारपासून (ता. ९) मर्यादित संख्‍येसह खुली करण्‍यात येणार आहेत. पर्यटकांनी येताना ऑनलाइन पूर्व नोंदणी करणे बंधनकारक करण्‍यात आले आहे. यासाठी अधिकृत संकेतस्‍थळ विकसित करण्‍यात आले आहे. पूर्व नोंदणी
न करता येणाऱ्या पर्यटकांना प्रवेश नाकारण्‍यात येणार आहे. प्‍लास्टिक प्रदूषण टाळणे, गाइड सोबत घेणे आदी अटींसह
प्रवेश खुला करण्‍यात आला आहे.
सुरक्षित व कौटुंबिक पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला अंधारबन जंगल ट्रेक, कुंडलिका ही पर्यटनस्‍थळे जुलै महिन्‍यात पर्यटकांच्‍या अनियंत्रित संख्‍येमुळे सुरक्षिततेच्‍या कारणास्तव बंद ठेवली होती. दरम्‍यानच्‍या काळात वन‍विभागाने सुरक्षिततेसाठी पाहणी केली. पर्यटकांची संख्‍या मर्यादित ठेवण्‍यासाठी नवीन उपाय केले. आता दोनही पर्यटन स्‍थळी खुली होणार असल्‍याने पर्यटकांमध्‍ये आनंदाचे वातावरण आहे. पर्यटक, स्‍थानिक ग्रामस्‍थ यांनी वनविभागाचे निर्णयाचे स्‍वागत केले.

याबाबत सहायक वनसंरक्षक मनोहर दिवेकर यांनी माहिती दिली की, अंधारबन, कुंडलिका व्‍हॅली ही पर्यटनस्‍थळे सुधागड वन्‍यजीव अभयारण्‍यात आहेत. येथे फक्‍त ऑनलाइन बुकिंग केलेल्‍यांनाच प्रवेश देण्‍यात येणार आहे. बुकिंग न करता येणाऱ्यांना प्रवेश देण्‍यात येणार नाही. एका दिवसात अंधारबन नेचर ट्रेलसाठी ७००, कुंडलिका व्‍हॅलीसाठी १०००, असे एकूण १७०० पर्यटकांनाच प्रवेश देण्‍यात येणार आहे.

अशी करा नोंदणी
शुक्रवार (ता. ८) सकाळी १० वाजल्‍यापासून booking.andharban.org या संकेतस्‍थळावर नोंदणी सुरु होणार आहे. या संकेतस्‍थळावर जाऊन रजिस्‍ट्रेशन करताना पसंतीचा दिवस निवडावा. आधारकार्ड, पॅनकार्ड पैकी वैध ओळखपत्र अपलोड करावे. ऑनलाइन पेमेंट पूर्ण करावे. पेमेंट झाल्‍यानंतर QR कोड असलेली पावती व्‍हॉटसअॅप, ईमेलवर मिळेल.
पर्यटकांनी QR कोड असलेली पावती पर्यटनस्‍थळांच्‍या प्रवेशद्वारावर दाखवल्‍यावर प्रवेश मिळेल. संपर्कासाठी- सागर भोसले, वनपाल, मो.९२८४४६१०४२.

ग्रुप बुकिंग नसणार
प्रत्‍येक पर्यटकाचे स्‍वतंत्र बुकिंग करणे गरजेचे आहे. एकाच वेळी दहा, वीस, पन्‍नास पर्यटकांचे एकगठ्ठा, ग्रुप बुकिंग तसेच पेमेंट होणार नाही. तर, ग्रुपमधील प्रत्‍येकाची स्‍वतंत्र वैयक्तिक माहिती भरून पूर्वनोंदणी करावी लागणार आहे.

भेट देण्‍याची वेळ व नियम
पहाटे सहा ते सकाळी ११.३० वा पर्यंत पर्यटकांना प्रवेश देण्‍यात येईल. सकाळी ११.३० नंतर येणाऱ्या पर्यटकांना प्रवेश बंद देण्‍यात येणार नाही. दुपारी ४.३० पर्यंत सर्व पर्यटकांनी अंधारबनातून बाहेर पडणे अनिवार्य राहील. दर सोमवारी अंधारबन, कुंडलिका व्‍हॅली पर्यटनासाठी पुर्णपणे बंद राहतील.

गाईडची सेवा बंधनकारक
दाट धुके, अचानक बदलणारे वातावरण, पावसाचे जोरदार प्रमाण, काही ठिकाणी घ्‍यावयाची खबरदारी, सुरक्षिततेचे नियमांचे काटेकोरपणे पालन यासाठी पर्यटकांनी नोंदणीकृत गाईडची सेवा घेणे बंधनकारक करण्‍यात आले आहे. हे गाइड स्‍थानिक असून भौगोलिक परिस्थितीची माहिती असल्‍याने पर्यटकांना फिरताना निसर्गाचा आनंद घेणे, प्रसिद्ध पॉईंटस, धोकादायक ठिकाणे व कृती टाळणे, तसेच तातडीच्‍या प्रसंगी मदत यासाठी गाईड उपयुक्‍त ठरणार आहेत.

प्‍लास्टिक टाळण्‍यासाठी शुल्‍क
पर्यटक मोठ्या प्रमाणात प्‍लास्टिक बॉटल, इतर वस्‍तु बाळगतात. काही पर्यटक त्‍यांचा वापर झाल्यानंतर परिसरातच फेकून देतात. हे टाळण्‍यासाठी अंधारबनात प्रवेश करताना प्रवेशद्वारावर पर्यटकांकडून प्‍लास्टिकच्‍या प्रत्‍येक वस्तूंसाठी ५० रुपये डिपॉझिट स्वरूपात जमा करून घेतले जातील. ट्रेक पूर्ण झाल्‍यानंतर प्‍लास्टिक वस्‍तू परत दाखविल्यानंतर जमा करून घेतलेले पैसे परत केले जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com