
आंबी येथे वाळुमाफियांवर कारवाई
मोरगाव/ वडगाव निंबाळकर, ता. ३० : आंबी-चांदगुडेवाडी (ता. बारामती) येथील कऱ्हा नदी पात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या सहा वाळू माफियांवर सोमवारी पहाटे (ता.३०) कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून तीन ट्रॅक्टर, दोन जेसीबी व एक ट्रक असा ४७ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुणे ग्रामीण पोलिसांचे स्थानिक गुन्हे शाखा व वडगाव निंबाळकर पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले.
वाळूमाफिया मोरगाव -आंबी येथील कऱ्हा नदी पात्रात अनेक वर्षांपासून बेसुमार वाळू उपसा करत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. या वाळू माफीयावर रविवारी (ता.२९) पहाटेच्या सुमारास कारवाई करण्यात आली. यात श्यामराव चांदगुडे (वय ४६, रा.धरणवस्ती,चांदगुडेवाडी ता.बारामती), स्वप्नील ज्ञानेश्वर भोंडवे (वय २७, रा.आंबी खुर्द, ता.बारामती), विठ्ठल तानाजी जाधव (वय २५, रा.आंबी खुर्द, ता.बारामती), अमोल शंकर सणस (वय ४६, रा. उरूळीकांचन ता.हवेली), महादेव बाळू ढोले (वय ३८, रा. मोरगाव चैथाळवस्ती ता.बारामती), विकास बाबासाहेब चांदगुडे (वय ३५, रा.धरणवस्ती,चांदगुडेवाडी, ता.बारामती) यांच्यावर कारवाई करण्यात आली. यावेळी आणखी अनोळखी तिघेजण पळून गेले. तसेच रविवारी रात्री आंबी चांदगुडेवाडी गावचे हददीत धरणवस्ती येथे कऱ्हा नदीपात्रात बेफीकीरपणे वाळू उत्खन्न करून वाहने भरत असल्याचे निर्दशनास आले होते.
यावेळी पाच ब्रास वाळू, जेसीबी मशिन, ट्रक व टॅक्टर डंपीग ट्रॉलीसह मुद्देमाल पोलिस उपनिरिक्षक योगेश शेलार यांनी जप्त केला. अवैध वाळू उपसा आणि वाहतूकप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरिक्षक योगेश शेलार करीत आहेत.
कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान
या परिसरातील ही सर्वात मोठी कारवाई असून स्थानिक महसूल आणि पोलिस यंत्रणा यांच्या वरदहस्ताने सुरू असलेला बेसुमार वाळुउपसा आत्ता तरी बंद होईल असा विश्वास नागरिकांमधून व्यक्त होत आहे. वाळुमाफियांच्या दादागिरिमुळे तक्रार करण्यास न धजावणारे शेतकरी या कारवाईमुळे समाधानी आहेत. वाळूउपसा करणारांवर वरिष्ठ पातळीवरून अशाच कडक कारवाई व्हाव्यात अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.