
मोढवे येथे मोकाट गाईंमुळे शेतकरी त्रस्त
मोरगाव, ता.९ : मोढवे (ता. बारामती) येथे मोकाट गाईंमुळे दोन वर्षांपासून शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेतामध्ये कोणतेही पीक घेतले तरी गाई ते उद्वस्त करतात. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कोणतेच प्रशासन या समस्येची दखल घेत नसल्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. यामुळे गाईंचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.
मोढव्याच्या सरपंच शीतल मोरे, ग्रामपंचायत सदस्य वैभव मोरे यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यासह बारामती पंचायत समिती, बारामती तहसील कार्यालय, बारामती वन विभाग यांच्याकडे वारंवार लेखी पत्र व्यवहार करून मोकाट गाईंचा बंदोबस्त करण्याची मागणी वाढली आहे.
दरम्यान, मोढवे परिसरामध्ये फिरणाऱ्या वनगायी नसून, त्या पाळीव गाई आहेत. त्यामुळे वनविभागाचा त्याच्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध येत नसल्याचा खुलासा मोरगावचे वनपाल अमोल पाचपुते यांनी दिला आहे. यापूर्वी बारामती तालुक्यातील प्रत्येक सरकारी यंत्रणेशी संपर्क करून विविध रंगाच्या सुमारे ८० गायींचा कळप पकडून तो हद्दपार करावा व शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी शेतकरी, ग्रामस्थ, ग्रामपंचायत यांनी केली आहे, मात्र कोणती सरकारी यंत्रणा मोढवेकरांना याबाबतीत मदत करत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
शेतकऱ्यांसाठी वाढली डोकेदुखी
वास्तविक मोढवे परिसर व वनक्षेत्र, झाडाझुडपांचा व सावलीचा परिसर आहे. येथे गाईंना चारा आणि पाणी या दोन्हीसाठी सुरक्षिततेचे वातावरण आहे. त्यामुळे त्या येथून कोठेही जात नसल्याची परिस्थिती आहे. प्रत्यक्षात शेतकरी चारा पीक, भाजीपाला, अन्नधान्य कोणतेही पीक घेतले तरी हाताला आलेले पीक या गाईंचा कळप सपाट करत असल्याची परिस्थिती शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी बनली आहे.
आत्तापर्यंत दोन तीन वर्षांत काट गाईंनी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. आम्हाला आता कोणतीही मदत नको पण या गाई आवरा, अशीच ग्रामस्थांच्या वतीने आग्रही प्रशासनाकडे केली आहे.
- शीतल मोरे, सरपंच मोढवे