भरदिवसा घरफोडीचे सत्र सुरूच
मोरगाव, ता. ७ : लोणी पाटी (ता. बारामती) येथे मंगळवारी (ता. १) सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास राहत्या घरातून १० ते १२ तोळे सोने चोरी झाले. ही घटना नवीन असतानाच तरडोली (ता. बारामती) येथेही दोन ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न झाल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
ही दोन्ही गावे बारामती- पुणे मुख्य रस्त्यालगत आहेत. लोणी पाटी येथील घराचा दरवाजा उघडा असल्यामुळे हा प्रकार घडला. मात्र, तरडोली येथे शशिकांत भापकर यांच्या बंगल्याचे भर दिवसा कुलूप काढण्याचा प्रयत्न नुकताच चोरट्यांनी केला. मात्र, त्यामध्ये त्यांना यश आले नाही. तसेच येथील नीलेश शिंदे कुंटुंबासहित शेतात कामाला गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या घराचा मुख्य दरवाजा सोडून घरालगत असणाऱ्या दुसऱ्या खोलीची कडी काढून मुख्य घरात प्रवेश केला. घरातील पेटीत ठेवलेली रोख रक्कम चोरट्यांनी गायब केली. शिंदे हे रोजंदारी करून उपजीविका करत असून, गाडीचा हप्ता भरण्यासाठी त्यांनी हे पैसे जमवले होते.
मोरगाव पोलिस मदत केंद्राचे राहुल भाग्यवंत यांनी घटनास्थळी भेट देऊन दोन्ही प्रकाराची माहिती घेतली. त्या दृष्टीने पुढील तपास सुरू आहे. मात्र, तरडोली ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, याशिवाय अनेक ठिकाणी विजेची गरज असताना सार्वजनिक ठिकाणचा परिसर अंधारात राहतो. त्या ठिकाणी ही विजेची सोय करावी, अशा सूचनाही पोलिस प्रशासनाने ग्रामपंचायतीला दिल्या आहेत.
लोणी भापकर, मासाळवाडी, तरडोली परिसरात सर्व शेतकरी व मजूर वर्ग आहे. सध्या सर्वच ठिकाणी शेतातील खरीप हंगामातील कामे चालू असल्यामुळे दिवसा राहत्या घरांना कुलूप लावूनच शेतात जावे लागते. पोलिस प्रशासनाने व स्थानिक प्रशासनाने असे प्रकार टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे.
सध्या दिवसा घरफोडी करून चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, सर्वांनी दिवसा शेतात अथवा बाहेरगावी गेले तर आपल्या घरातील मौल्यवान वस्तू काळजीपूर्वक सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात. सर्वांनी सतर्क व सुरक्षित राहावे, तसेच संशयित अनोळखी गावात फिरत असतील तर तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.
- मनोज कुमार नवसरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, सुपे