मोरगाव प्रादेशिक योजना डबघाईला
मोरगाव, ता. १० : बारामती तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील गावांसाठी गेली अनेक वर्षांपासून वरदान असलेली मोरगाव प्रादेशिक योजनेची पाणीपट्टी थकबाकी सहा कोटी ५३ लाख ४६ हजार १७० असून, थकबाकीमुळे ही योजना डबघाईला आली आहे.
सन १९९८ मध्ये सुरू झालेली ही योजना गेल्या अनेक वर्षांत १०० टक्के वसुली या चौकटीत कधीच बसली नाही. थकबाकीमुळे अडचणीत आलेली योजना पाणी वापरत असलेल्या गावांकडे हस्तांतर करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने केला होता. मात्र, योजना चालवणे आणि पाणीपट्टी वसुली करणे यासाठी एकाही ग्रामपंचायतीने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही.
बारामती पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्याकडून या योजनेचे पाणी वापरत असलेल्या ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य, ग्रामसेवक व प्रादेशिक योजना चालवणारे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांची समन्वय बैठक झाली. मात्र, एकाही ग्रामपंचायतीने योजना चालविण्यासाठी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे सध्या ही योजना प्रायोगिक तत्त्वावर खासगी यंत्रणेकडून चालवली जात आहे. मात्र, पाणीपट्टी वसुलीची परिस्थिती थकबाकीच्या चक्रव्यूहात कायमच राहिल्यामुळे ही योजना चालविण्यास खासगी यंत्रणेकडूनही फारसा उत्साह नाही. दर महिन्याला येणारा खर्चही वसुलीमधून निघत नसल्याची खंत ही योजना चालवणारे रोहिदास रासकर यांनी व्यक्त केली.
थकबाकी वसुली करण्यासाठी अनेक वेळा पाणीपुरवठा स्थगित केला जात आहे. मात्र, थकबाकीपेक्षा अतिशय अल्प रक्कम भरून पाणी चालू करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून तगादा लावला जात असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी दिली.
डबघाईला आलेल्या योजनेस नियमित पाणीपट्टी भरून संजीवनी देण्यासाठी योजनेचे पाणी वापरत असलेल्या ग्रामपंचायतींनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा. प्रत्येक ग्रामपंचायतींना थकबाकी भरण्यासंदर्भात नोटिशीद्वारे कळविण्यात आले आहे. योजना बंद झाली तर पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे ग्रामपंचायतींनी टप्प्या टप्प्याने थकीत पाणीपट्टी भरावी, असे आवाहन मोरगाव प्रादेशिक योजनेचे शाखा अभियंता विकास बुरसे यांनी केले आहे.
थकबाकीचे ग्रहण लागलेली योजना
सध्या नाझरे जलाशय १०० टक्के भरले असून, या जलाशयावरील योजना यांना एक वर्ष तरी मुबलक पाणी मिळणार आहे. मात्र, जलाशयातील पाणी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचणे व शुद्धीकरण करून योजनेच्या जलवाहिनीपर्यंत वितरित होण्यासाठी लागणाऱ्या विजेवर मोठ्या प्रमाणात खर्च होत असून, त्यासाठी नियमित पाणीपट्टी वसुली होणे आवश्यक आहे. योजनेचे पाणी थकबाकीमुळे बंद केल्यास व भविष्यकाळात थकबाकीचे ग्रहण लागलेली योजना आर्थिक अडचणींमुळे बंद झाल्यास या भागातील गावांचा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे.
आंबी बुद्रुक, आंबी माळवाडी, आंबी खुर्द, भोंडवेवाडी, मावडी क. प, मोरगाव, तरडोली, पवारवाडी पाटी, लोणी भापकर, लोणी भापकर, पाटी वस्ती समिती, बाबुर्डी, कोकरे वस्ती, मासाळवाडी, माळवाडी लोणी, दगडे वस्ती, सावता माळीनगर, काऱ्हाटी हायस्कूल, जळगाव कडेपठार, कोकणे वस्ती, लोणकर वस्ती, चौलंग वस्ती, भिलारवाडी, जळगाव सुपे, कऱ्हावागज, अंजनगाव या गावांची मार्च २०२५ अखेरपर्यंतची थकबाकी सहा कोटी ५३ लाख ४६ हजार १७० रुपये आहे.
-विकास बुरसे, शाखा अभियंता, मोरगाव प्रादेशिक योजना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.